ऑनलाइन लोकमत
पुणे,दि. 23 - राज्याचे महसुल मंत्री एकनाथ खडसे यांनी भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली ४० कोटी रूपयांची ३ एकर जागा पत्नी व जावयाच्या नावाने खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी याबाबतची कागदपत्रे उजेडात आणून खडसे यांनी बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचे सबळ पुरावे सोमवारी सादर केले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळया कारणांनी वादाच्या भोवºयात अडकलेले एकनाथ खडसे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
काय आहे प्रकरण
पिंपरी-चिंचवड येथील भोसरी एमआयडीसीमधील अब्बास रसुलभाई उकानी यांच्या मालकीची ३ एकर जागा एमआयडीसीने २५ वर्षांपूर्वी ताब्यात घेतली. दरम्यान उकानी यांनी ही जागा परत मिळावी म्हणून सप्टेंबर २०१५ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यानंतर त्यांनी महसूल विभागाकडे दावा दाखल केला होता. महसूल विभागाकडे याबाबतचा दावा प्रलंबित असताना एकनाथ खडसे यांनी उकानी यांच्याकडून २८ एप्रिल २०१६ रोजी ही जमीन खरेदी केली आहे. पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने हा व्यवहार झाला आहे अशी माहिती हेमंत गावंडे यांनी दिली आहे.
सादर केले पुरावे
हेमंत गावंडे यांनी मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांनी अब्बास उकानी यांच्यासमवेत २८ एप्रिल रोजी केलेले खरेदीखत, मुद्रांकशुल्क जमा केल्याची पावती, मंदाकिनी खडसे व गिरीश चौधरी यांच्या सहया व अंगठयाचे ठसे, एमआयडीच्या नावाने असलेला सातबारा उतारा, उच्च न्यायालयातील याचिका आदी कागदपत्रे पुराव्या दाखल सादर केली आहेत.
भोसरी एमआयडीसीमधील ही ३ एकर जमिन एमआयडीसीने उकानी यांच्याकडून २५ वर्षापूर्वीच संपादित केली आहे. सध्या या जमिनीची किंमत ४० कोटी रूपये इतकी असून त्याचा ताबा एमआयडीसीकडे आहे. या जागेवर एमआयडीसीकडून औद्योगिक वापरासाठी प्लॉट पाडण्यात आले आहेत. तरीही खडसे यांनी परस्पर पत्नी मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी यांच्या नावाने उकानी यांच्याकडून ही जमिन ३ कोटी ७५ लाख रूपयांना खरेदी केली. या व्यवहारापोटी १ कोटी ३७ लाख रूपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले. या जमिनीचा ७/१२ एमआयडीच्या नावाने असतानाही हवेलीच्या दुय्यम निबंधक कार्यालयाने हा जमिन खरेदी-विक्रीचा व्यवहार करून दिला आहे, त्यामुळे हवेली दुय्यम निबंधक कार्यालयाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.