- मनोज मुळ्ये(उपमुख्य उपसंपादक, रत्नागिरी)पोटापाण्यासाठी, कामधंदा मिळवण्यासाठी, कधीकाळी सोडलेल्या गावात आयुष्याची अखेरची काही वर्ष घालवण्यासाठी किंवा गुंतवणूक म्हणून मुंबई, पुण्याकडील चाकरमानी मंडळी कोकणात जागा खरेदी करतात. मात्र, दुर्दैवाने अनेक प्रकरणांमध्ये त्यांची फसगत होते. आयुष्यभराची जमापुंजी जागेत घालूनही जागेचा ताबा मिळत नाही आणि गुंतवलेले पैसेही परत मिळत नाहीत. ही फसगत टाळायची असेल तर खूप काळजीपूर्वक व्यवहार करणे गरजेचे आहे आणि प्रत्येक व्यवहार तोंडी न ठेवता कागदावर उतरवणे महत्त्वाचे आहे.
२५ - ५० रुपयांचा एक किलो कांदा घेतानाही आपण त्यातील प्रत्येक कांदा नीट आहे की नाही, हे तपासून घेतो. पण आयुष्यभर कमावलेले कष्टाचे पैसे गुंतवताना मात्र आपण त्याच्या सर्व बाजूंचा विचार करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रलोभनांना बळी पडणं हा माणसाचा स्वभावच आहे. स्वस्तात जागा मिळते म्हणून त्यात पैसे गुंतवणारे कमी नाहीत. अर्थात प्रत्येक कागद बारकाईने तपासणाऱ्या लोकांच्या पदरीही कधी कधी फसवणूक येते. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असाच एक प्रकार नुकताच घडला. जागेसाठी एकरकमी रक्कम अदा केल्यानंतर नोंदणीकृत साठेखत केले गेले. मात्र, त्यानंतर जागेचा ताबा देण्यास टंगळमंगळ करण्यात आली. त्याच ठिकाणी अन्य प्लॉटिंगमध्ये एकच प्लॉट विकण्यासंदर्भात दोन लोकांशी चर्चा झाली आणि पैसेही घेतले गेले.
असे प्रकार अलीकडे कोकणात वाढत आहेत. अर्थात यात कोकणी लोकांचा सहभाग अत्यल्प किंवा नाहीच्या बरोबरीचा आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध नाही आणि असलेल्या शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही. गावात शिक्षणाच्या पुरेशा सोयी नाहीत म्हणून ग्रामीण भागातील लोक शहराकडे जात आहेत. अशा लोकांकडून परप्रांतातील लोक कमी दराने जागांची खरेदी करतात. एखाद्या स्थानिक माणसाला हाताशी धरून ते अडचणीतील लोकांकडून स्वस्तात जागा पदरात पाडून घेतात. त्याचे प्लॉटिंग करतात आणि मुंबई, पुण्याकडे त्याची भली मोठी जाहिरात करतात. निसर्गरम्य गावात जागा घ्यायला कोणाला आवडणार नाही. त्यातही नोकरी, व्यवसायानिमित्त ऐन तारुण्यात गाव सोडून गेलेल्या लोकांना म्हातारपणी गावी परतावे, असे वाटते. आपल्या गावात नाही तर किमान तालुक्यात किंवा जिल्ह्यात कोठे ना कोठे छोटीशी जागा घेऊन घर बांधण्याचे त्यांचे स्वप्न असते. त्यामुळे कोकणातील जागांची जाहिरात मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये केली जाते आणि अशा लोकांकडून दामदुप्पट पैसे उकळले जातात. परप्रांतातून येथे येऊन असे उद्योग करणारे आता वाढू लागले आहेत.
कोकणात किंवा कोठेही जागा खरेदी करताना किंवा एखादी सदनिका खरेदी करताना खूप काळजीपूर्वक व्यवहार करणे अत्यंत गरजेचे आहे. कोकणातला निसर्ग चांगला आहे, म्हणून कोकणात नक्की या. पण फसू नका. आयुष्यभराची जमापुंजी असलेली रक्कम गुंतवल्यानंतर त्याचा परतावा म्हणून तुमच्या पदरात त्रास पडू नये, एवढीच इच्छा.
काय करायला हवे?कोठेही जागा किंवा फ्लॅट खरेदी करताना तो विकणाऱ्या व्यक्तीची किंवा संस्थेची माहिती गोळा करणे आवश्यक आहे.जी जागा किंवा फ्लॅट खरेदी करणार त्याची कागदपत्रे आपल्या वकिलाकडून तपासून घेणे गरजेचे आहे.जागेचा सातबारा ताब्यात घेऊन तो नेमक्या कोणत्या प्रकारातील आहे, याची माहिती सर्वात प्रथम घेतली पाहिजे.जागांचे अनेक प्रकार आहेत. कृषक व अकृषक, खालसा, देवराई अशा वेगवेगळ्या नोंदी सातबारावर स्पष्ट असतात. त्यामुळे सातबारा तपासून जागा विकत घेण्यासाठी योग्य आहे की नाही, याची काळजी घ्यायला हवी.अर्थात सर्व प्रकारची कागदपत्रे तपासून झाल्यानंतरही फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे प्लॉटिंग करणारे प्रवर्तक किंवा संस्था किंवा व्यक्ती यांच्याशी कुठलाही व्यवहार करताना तो तोंडी न करणे आणि प्रत्येक व्यवहाराची कागदावर अधिकृत नोंद करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणतेही आश्वासन तोंडी न घेता ते संबंधित व्यक्तीकडून लिहून घेणे अत्यंत गरजेचे आहे. महारेरा नावाचे आयुधजमीन जागांच्या व्यवहारात लोकांची होणारी फसवणूक लक्षात घेऊन सरकारने महारेराच्या माध्यमातून खूप मोठे आयुध सर्वसामान्य खरेदीदारांना उपलब्ध करून दिले आहे. कोणत्याही प्रकल्पाची सुरुवात करताना महारेराकडे त्याची नोंदणी करावी लागते. प्रकल्प काय आहे, त्याचा खर्च किती आहे आणि तो किती काळात पूर्ण होणार आहे, याची माहिती महारेराकडे नोंदवावी लागते. महारेराच्या सर्व नियमांचे पालन संबंधित व्यक्ती, संस्था यांना करावे लागते. प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही तर महारेराच्या नियमांचे उल्लंघन केल्याची शिक्षा किंवा दंड संबंधितांना होऊ शकतो. ग्राहकाची फसवणूक, ग्राहकाला होणारा त्रास टाळण्यासाठी हे आयुध सरकारने दिले आहे. मात्र सर्वसामान्य लोकांना त्याची माहितीच नसते.