राजकारणात संधी अपघातानेच, नेतृत्वासाठी एका युवकाची गरज होती; अजित पवारांचे जनतेला खुले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 08:30 AM2024-02-27T08:30:44+5:302024-02-27T08:31:00+5:30
कोणालाही दगा देणे - किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता. - अजित पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावीत, याच उद्देशाने आपण वेगळी भूमिका घेतली. यात कोणालाही दगा देणे - किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता. लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या बंडाचे समर्थन केले आहे. यासंदर्भात त्यांनी सोमवारी जनतेला खुले पत्र लिहिले आहे.
पत्रात अजित पवार म्हणतात, मला राजकारणात कोणी आणले, कोणी मंत्रिपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरेतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली.
...म्हणून मोदी-शाह यांच्यावर विश्वास
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली होणारा विकास महत्त्वाचा वाटला. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे. त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे वाटल्याने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.