पुणे - दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आलेत. त्यात या प्रकरणाची पुन्हा SIT मार्फत चौकशी केली जाईल अशी घोषणा विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर विरोधकांनी राहुल शेवाळे यांच्याविरोधात महिलेवर अन्याय केल्याचा आरोप केला. त्याची चौकशी करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले. त्यानंतर आता राष्ट्रवादी नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी राहुल शेवाळेंविरोधातील त्या पीडित महिलेला फेसबुक लाईव्ह करत सगळ्यांसमोर आणले आहे.
या FB लाईव्हमध्ये पीडित महिला सांगते की, मी दिल्लीची आहे, मी दुबईला काम करायची. २८ एप्रिल २०२१ ला मी साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. माझा जबाब नोंदवला गेला. परंतु आतापर्यंत FIR नोंदवला नाही. खासदार असल्याने राजकीय दबाव पोलिसांवर आणला जातोय. माझं कुटुंब आज उद्ध्वस्त झालं. आम्ही २ वर्ष एकत्र होतो. स्वत:च्या कुटुंबाचा विश्वासघात करून राहुल शेवाळेने मला फसवलं. तुम्हाला जनतेने निवडून दिलंय हे माहिती असताना एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केले गेले. धमकावून माझं वारंवार शोषण केले गेले. चांगला माणूस म्हणून सुरुवातीला ओळख केली त्यानंतर खरा चेहरा समोर आला असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत दुबईत मला गुन्ह्यात अडकवलं. १५ डिसेंबरला मी या प्रकरणात निर्दोष सुटले. मी भारतात येऊ नये आणि राहुल शेवाळेंचे सत्य समोर आणू नये यासाठी माझं मानसिक खच्चीकरण करण्यात आले. मी इन्स्टाग्रामवर फोटो लावला त्यावरून मला फसवण्यात आले. मला २४ तास मुख्यालयात ठेवण्यात आले. माझ्यावर कुणी तक्रार दिली याबाबत सांगितले नाही. मला लोकांमध्ये हातात बेड्या टाकून जेलमध्ये टाकलं. राहुल शेवाळेंच्या बायकोला सगळं काही माहितं होते. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा मी कोर्टात हे पुरावे सादर करेन. १० महिन्यापासून मी लढाई लढतेय. १९ व्या वर्षी मी दुबईला गेली. माझं टेक्सटाईल बिझनेस होतं. माझं करिअर, प्रतिमा सगळं काही राहुल शेवाळे यांनी उद्ध्वस्त केले. माझ्यासोबत जे काही झाले ते कुठल्या मुलीसोबत होऊ नये यासाठी मी लढाई लढतेय असं या पीडित महिलेने सांगितले.
दरम्यान, मी सगळीकडे न्याय मागितला. परंतु मला कुणीही न्याय दिला नाही. मला खोटी आश्वासने देऊन शोषण केले गेले. मी खासदार आहे पैसे दाबून तोंड बंद करू असं त्यांना वाटतं. मला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. आजही माझ्या जीवाला धोका आहे. माझा अपघातही घडवू शकतात. ५ कोटी रुपयांची ऑफर मला दिली होती. आजपर्यंत या प्रकरणी FIR दाखल का झाला नाही? माझ्यासोबत असताना बायकोचा फोन आल्यानंतर तो कट केला जायचा. मराठीत एकमेकांशी भांडण करत होते. पॉझिटिव्ह दिशेने मी या नात्याचा विचार करत होती. पण माझा वापर करून घेण्यात आला. मी माझ्या हक्कासाठी लढत राहणार असं या पीडित महिलेने म्हटलं.