भाजप-सेनेसोबत जाऊन अजित दादांना भविष्यात CM पदाची संधी आहे? सुनिल तटकरे स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 12:39 AM2023-07-09T00:39:09+5:302023-07-09T00:40:19+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या संधीसंदर्भात स्पष्ट शब्दात भाष्य केले आहे...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत, आठ आमदारांसह राज्यातील भाजप-शिवसेना (शिंदे गट) सरकारला पाठिंबा देत मंत्री पदाची शपथ घेतली. या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले असून शरद पवार आणि अजित पवार हे काका-पुतणे आमनेसामने आले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकमत डिजिटल मीडियाचे संपादक आशिष जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची खास मुलाखत घेतली. यावेळी तटकरे यांनी अनेक प्रश्नांना बिनधास्त उत्तरे दिली. यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या संधीसंदर्भातही त्यांनी भाष्य केले.
राष्ट्रवादीतील या फुटीनंतर, अजित पवारांनी शक्तीप्रदर्शन करत, "मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल. माझ्या मनात महाराष्ट्राच्या सार्वांगिन विकासासंदर्भात काही कल्पना आहेत. त्या मी मुख्यमंत्री झालो, तर चांगल्या पद्धतीने राबवू शकेन," असे आपल्या भाषणातून म्हटले होते. यावरून, भाजपसोबत जाऊन आणि शिंदेंची शिवसेना सोबत घेऊन, अजित पवारांना भविष्यात मुख्यमंत्री पदाची संधी आहे का? असा प्रश्न तटकरे यांना विचारण्यात आला. यावर तटकरे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले.
राज्यात दादा मुख्यमंत्री व्हायवेत अशी लोकांची इच्छा -
तटकरे म्हणाले, "राजकारणात कधीही कशाही पद्धतीचे प्रसंग निर्माण होत असतात. एक खरे आहे की, आता आम्ही भाजप- शिवसेनेसोबत (एकनाथ शिंदे) सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाही आम्ही एत्रितपणे लढणार आहोत. दादांच्या मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत, राज्यात दादा मुख्यमंत्री व्हायवेत अशी लोकांची इच्छा आहे. मात्र, आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्हता लक्षात घेता, जेव्हा केव्हा शक्य होईल, तेव्हा ती संधी त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारे येऊ शकते."
अजित दादा हे 1999 पासून ते संघटनेत दुय्यम पद्धतीचे नेतृत्व करत होते. मात्र 2004 नंतर दादांचे स्थान राज्य पातळीवरील नेता म्हणून निर्माण झाल्यापासून, त्यांची प्रचंड मेहनत, लोकांचे प्रश्न सोडविण्याची आणि प्रशासनावरील त्यांची विलक्षण हातोटी आणि दिवसातील 17-18 तास काम करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. येथे एक गोष्ट सांगायला मला निश्चितपणे आनंद होईल की, महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत आपले स्थान पहिल्या क्रमांकाचे करण्यात त्यांची मेहनत त्यांचे कष्ट निश्चितपणे उपयुक्त ठरतात, असेही तटकरे यावेळी बोलताना म्हणाले.
बघा सविस्तर मुलाखत -