मुंबई : कोविडच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. दररोजची रुग्ण संख्याही पाचशेहून कमी असल्याने मुंबईतील सर्व निर्बंध लवकरच शिथिल होणार आहेत. पुढच्या आठवड्याभरात नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण होत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत मुंबई शंभर टक्के अनलॉक होईल, असे संकेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.
राज्य सरकारने ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झालेल्या शहरांमधील सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र मुंबईत अद्यापही हॉटेल आणि लग्नसमारंभ येथील एकूण उपस्थितीची मर्यादा आहे. येत्या आठवड्याभरात मुंबईत शंभर टक्के लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारी अखेरपर्यंत मुंबईत शंभर टक्के अनलॉक केला जाऊ शकतो, अशी शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा ऑफलाईनही... ऑनलाईनही !- पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांवर लेखी परीक्षेची सक्ती करू नका. परीक्षेसाठी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन परीक्षेचाही पर्याय उपलब्ध करून द्या, अशी सूचना मुंबई पालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांना केली. - यामुळे अजूनही ऑनलाइन शिक्षणालाच पसंती देणाऱ्या विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांसमोर ऑफलाइन तसेच ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारच्या परीक्षांचे पर्याय उपलब्ध करून द्यावेत, असे परिपत्रक मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी शाळांना पाठवले आहे.
शनिवार- रविवारीही शाळा सुरू ठेवा - उपमुख्यमंत्री -कोरोनामुळे विद्यार्थ्यांची पावणेदोन वर्षे वाया गेली आहेत. हे नुकसान भरून निघाले पाहिजे. त्यामुळे राज्यातील सर्वच शिक्षकांनी शनिवार, रविवारी शाळा सुरू ठेवून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. आधीच सततच्या सुट्ट्यांमुळे मुलांचे खूप नुकसान झाले आहे. आता पुन्हा शनिवार, रविवार सुट्टी कशाला? त्यापेक्षा मुलांना शिकवा व झालेले नुकसान भरून काढा. कोरोनामुळे राज्यातील ऑनलाइन शाळांचा उपक्रम यशस्वी झाला. पण, प्रत्यक्ष शाळेची मजा ऑनलाइनमध्ये येत नाही. त्यामुळे शाळा ऑफलाइन पद्धतीने भरवण्यावर त्यांनी भर दिला.