Eknath Shinde Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर पार पडला. सरकारच्या कामांचा उहापोह करत शिंदेंनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकलं. दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळचा एक प्रसंग सांगितला. आईची प्रकृती चांगली नव्हती, पण शब्द दिला होता आणि तो मी पाळला. परत येईपर्यंत आईचा मृत्यू झाला होता, असे सांगताना शिंदे भावूक झाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, "जोपर्यंत ही तमाम जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला पदाची कुठलीही चिंता नाही. पदाची लालसा नाही. मी जी-२० परिषदेलाही उपस्थित असतो आणि मुंबईतील नालेसफाईची पाहणी करायला नाल्यातही उतरतो. हा एकनाथ शिंदे आहे! दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमला उपस्थित असतो आणि गोर गरिबांच्या शौचालयांचीही पाहणी करायलाही जातो. मला बिलकूल त्याची लाज वाटत नाही. कारण मी सर्वसामान्य माणसातील शिवसैनिक आहे."
"मी शाखाप्रमुख ते आज मुख्यमंत्री झालोय. माझ्या परिवाराला मी कधी वेळ दिला नाही. माझ्या आईवडिलांना कधी वेळ दिला नाही. माझ्या पत्नीला वेळ दिला नाही. माझ्या मुलांना वेळ दिला नाही. माझा परिवार हा महाराष्ट्र समजून शिवसेना एके शिवसेना समजून काम केलं, हा माझा गुन्हा आहे? ही माझी चूक आहे?", असा सवाल त्यांनी केला.
डॉक्टर म्हणाले, 'तातडीने या'; शिंदेंनी सांगितला सगळा प्रसंग
"माझी आई मृत्यूशय्येवर होती. त्यावेळी लोकसभेच्या निवडणुका होत्या. मी गावित यांचा प्रचार करायला गेलो. जेव्हा जवारला घाट चढत असताना मला कॉल आला. डॉक्टर म्हणाले तुम्ही तातडीने या. मी त्यांना म्हणालो, माझा प्रचार आहे. गावितांनी कार्यक्रम लावले होते. मी डॉक्टरला सांगितलं मी येतो. मी सगळं आटोपून ९ वाजता पोहोचलो. माझ्या आईचा मृत्यू झाला होता. हे कटू सत्य मला माहिती होतं. परंतू मी शब्द गावित आणि तिथल्या कार्यकर्त्यांना दिला, मी तो पाळला; हा काय माझा गुन्हा आहे? ही काय माझी चूक आहे?", असे सांगताना ते भावूक झाले.
"...तर हा एकनाथ शिंदे तुम्हाला इथे दिसला नसता"
"असे अनेक प्रसंग आहेत, माझ्या आयुष्यात. मी खूप दुःख भोगलेली आहेत. मी संघर्ष केलाय. धर्मवीर आनंद दिघे साहेब माझ्या पाठीशी उभे राहिले नसते, तर हा एकनाथ शिंदे तुम्हाला इथे दिसला नसता. का इतकं माझ्याबरोबर वैर? का मत्सर? का द्वेष? माझी राजकीय पार्श्वभूमी नाही म्हणून? माझा बाप मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही म्हणून?", असे सवाल करत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना घेरले.