कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४६ - कांचनगांव-खंबाळपाडाचे भाजपाचे नगरसेवक शिवाजी शेलार यांच्या निधनामुळे त्यांच्या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे. १९ एप्रिलला होणाऱ्या या निवडणुकीसाठी शिवाजी यांचा मुलगा स्रेहल उर्फ साई शेलार यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यांनी रविवारी केडीएमसीच्या फ प्रभागात निवडणूक निर्णय अधिकारी देविदास टेकाळे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. यावेळी शेलार कुटुंबाने मोठया प्रमाणावर शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसकडूनही तसे संकेत मिळत असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी अर्ज दाखल करावयाचा अखेरचा दिवस असल्याने याबाबतचे चित्र तेव्हाच स्पष्ट होईल.शिवाजी शेलार यांचे ४ डिसेंबरला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते स्थायी समितीचे सदस्यही होते. स्थायीच्या त्यांच्या रिक्त जागेवर उपेक्षा भोईर यांना संधी मिळाली आहे. दरम्यान शेलार यांच्या प्रभागात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी ३ एप्रिलपर्यंत अर्ज भरायचे आहेत. त्यांची छाननी ५ एप्रिलला होईल. माघारीसाठी ७ एप्रिल, मतदानासाठी १९ एप्रिल आणि मतमोजणी २१ तारखेला होणार आहे. साई यांनी रविवारी अर्ज भरला तेव्हा त्यांच्या मातोश्री शिल्पा यांच्यासह माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपाचे गटनेते वरूण पाटील, उपमहापौर मोरेश्वर भोईर, शिवसेनेचे स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, नगरसेवक महेश पाटील, राहुल दामले, राजन आभाळे, संदीप पुराणिक, नगरसेविका खुशबू चौधरी, प्रमिला चौधरी, पदाधिकारी शिवाजीराव आव्हाड, शशिकांत कांबळे, नंदु परब, माजी नगरसेवक रवी पाटील, जितेंद्र भोईर आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीचे पदाधिकारी गंगाराम शेलार आदी उपस्थित होते. ही निवडणुक लढविण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून वरिष्ठांकडे विचारणा करण्यात आली होती. त्यात रविवारी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. दिवंगत शिवाजी शेलार यांचे ज्येष्ठ बंधू गंगाराम शेलार यांनी केलेली विनंती आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार शिवाजी शेलार यांना श्रध्दांजली म्हणून ही निवडणुक लढविणार नसल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी ‘लोकमत’ला सांगितले. काँग्रेसचे गटनेते नंदू म्हात्रे यांच्याकडूनही निवडणूक न लढविण्याचे संकेत मिळत असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)>शक्ति प्रदर्शनात ए बी फॉर्मचा विसर?साई शेलार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठया प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले. खंबाळपाडा प्रभागातील नागरिकांसह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना ए बी फॉर्म घरीच विसरल्याने साई यांच्यासह पदाधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यास विलंब लागला. साई यांना विचारता त्यांनी काही कागदपत्रे घरी राहीली होती, असे स्पष्टीकरण दिले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असून याबाबत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करीत असल्याचे ते म्हणाले.
पोटनिवडणूक बिनविरोध?
By admin | Published: April 03, 2017 4:27 AM