- मनोहर कुंभेजकर
मुंबई : मुंबईसह राज्यातील रिक्त झालेल्या 20 नगरसेवकांच्या जागेवर एकूण 10 महानगर पालिकांमध्ये पोटनिवडणूक होणार असल्याची राज्य निवडणूक आयोगाने अधिसूचना 9 मे रोजी जारी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम देखिल घोषित केला आहे. मात्र तारीख जाहिर केलेली नाही. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमा नुसार येत्या 17 मे ते 27 मे पर्यंत मतदार यादीत जर नवीन नावे टाकायची असतील तर टाकता येतील. तर येत्या 29 मे ला निवडणूक आयोग मतदारांची अंतिम यादी घोषित करणार असल्याचे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, परभणी, चंद्रपूर या 10 महानगर पालिकांमध्ये ही पोटनिवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सहसचिव राजाराम झेंडे यांनी ही अधिसूचना जारी केली आहे.
मुंबईतील प्रभाग क्रमांक 28 चे नगरसेवक राजपत यादव,32 च्या काँग्रेस नगरसेविका स्टेफी किणी, 76 च्या भाजपा नगरसेविका केशरबेन पटेल, 81 चे भाजपा नगरसेवक मुरजी पटेल यांच्या अवैध जातीच्या दाखल्याने न्यायालयाने रद्द केले होते. पालिका प्रशासनाने यावर शिक्कामोर्तब केले. राज्य निवडणूक आयोगाने जरी मुंबईत चार ठिकाणी पोटनिवडणूक घोषीत केली असली तरी, कलम 34 अन्वये मुंबई महानगर पालिकेत पोटनिवडणूक न घेता दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला नगरसेवकपदाची संधी दिली जाते.
मुंबईत पोटनिवडणूक कशाच्या आधारावरपालिकेत अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांच्या जागेवर शिवसेनेच्या दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार राजू पेडणेकर व शिवसेनेच्या सगुण नाईक यांच्या जागेवर काँग्रेसचे रफीक झकेरिया यांना संधी मिळाली. मग आता मुंबईतील 4 रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर घेतला असा सवाल सूत्रांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला.