मुंबई : मुंबापुरीत ‘मेक इन इंडिया’चा जागर सुरु असतानाच दुसरीकडे वांद्रे-वरळी सी लिंकलगत वांद्रे येथे फडकाविण्यात आलेला राष्ट्रध्वज अंधारात असल्याची माहिती जागृत मुंबईकराने ‘लोकमत’ला दिली.वांद्रे-कुर्ला संकुलात ‘मेक इन इंडिया’चा जागर सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन झाले. या निमित्ताने मुंबईत विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष, शिष्टमंडळे आणि प्रतिनिधी दाखल झाले आहेत. त्यांचा प्रवास सी-लिंकवरून होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महापालिकेने मोक्याच्या ठिकाणी रंगरंगोटीही केली आहे. परंतु, वांद्रे-वरळी सीलिंकलगत वांद्रे येथे फडकावण्यात आलेला राष्ट्रध्वज अंधारात आहे. याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही. ‘मेक इन इंडिया’सारखा सप्ताह सुरु असताना येथे फडकाविण्यात आलेल्या राष्ट्रध्वजावर पुरेसा प्रकाशझोत टाकणे गरजेचे आहे, असे जागृत मुंबईकरांचे म्हणणे आहे. याकडे यंत्रणेने गांभीर्याने लक्ष द्यावे, असेही तो म्हणाला. (प्रतिनिधी)
सी-लिंकलगतचा राष्ट्रध्वज अंधारात
By admin | Published: February 14, 2016 1:41 AM