राहुल शिंदे -
पुणे: कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर घातलेले थैमान व कोरोना बाधितांचा देशातील वाढता प्रादूर्भाव लक्षात घेतल्यास याबाबत संशोधन करण्याची आवश्यकता आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रूग्णांचा शोध घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तपासणी संचामधील ( टेस्टिंग कीट) अत्यंत महत्वाच्या 'पॉलीमर स्वॅब' ची निर्मिती करण्यात पुण्यातील सेंटर फॉर मेटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) मधील संशोधकांना यश आले आहे.
कोरोना तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तपासणी संचाची निर्मिती भारतात होत नाही.भारताला इतर देशांमधून त्याची आयात करावी लागते.जगभरात लोकडाऊन असल्याने आयात -निर्यात थाबली आहे.त्यामुळे तपासणी संचाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यावर उपाय म्हणून देशातील शास्त्रज्ञ व डॉक्टर स्वदेशी बनावटीच्या तपासणी संचाची निर्मिती करण्यात व्यस्त आहेत.त्याच पार्श्वभूमीवर सी-मेट मधील वरिष्ठ पॉलीमर शास्त्रज्ञ व या संशोधनामधील प्रमुख डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी वैशिष्टपूर्ण पॉलिमरचा वापर करून तपासणी संचामधील महत्वाचा पॉलीमर स्वॅब विकसित केला आहे.तसेच त्याची चाचणी घेण्यासाठी बंगलोर येथे पाठविला आहे.
डॉ.मिलिंद कुलकर्णी म्हणाले,कोरोना तपासणी संचाची आयात प्रामुख्याने जर्मनी इटली आणि अमेरिकेतून केली जाते.कोरोना संशयित व्यक्तीच्या घशातील द्रव पदार्थाचा नमूना घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॉलीमर स्वॅबची निर्मिती ही सध्याची सर्वात मोठी गरज आहे.त्यामुळे आम्ही या स्लॅबची निर्मिती केली आहे.स्वदेशी बनावटीच्या व केंद्र शासनाच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या निर्देशानुसार कृत्रिम व वैशिष्टपूर्ण पॉलीमर स्वॅब पुढील चाचणी करिता बेंगलोरला पाठविण्यात आले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे आपल्याला नजीकच्या काळात सुमारे 40 लाख स्लॅबची आवश्यकता आहे. तसेच सी-मेट मध्ये थ्रीडी प्रिंटिंगच्या सहाय्याने किफातशीर पॉलीमर स्लॅब विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे,असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
---------
पॉलीमर स्वॅब निर्मिती संशोधन कार्यात बेंगलोर येथील रंगादुराई मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. के.एल.श्रीधर,डॉ.एल.ज्योतिष कुमार,बंगलोर येथील ॲडिव्हीट मॅन्युफॅक्चरिंग सोसायटी ऑफ इंडिया (एएमएस आय) यांचा सहभाग आहे.- भारत काळे, संचालक, सी- मेट ,पुणे
------
कोरोना तपासणी संचाच्या बाबतीत भारत देश स्वयंपूर्ण व्हावा; यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.वैद्यकीय चाचण्यानंतर लवकरच पॉलीमर स्लबचे उत्पादन घेणे शक्य होईल.- डॉ. मुनिरत्नम,महासंचालक, सी- मेट