लोकमत न्यूज नेटवर्ककणकवली (जि.सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा तसेच येथील प्रगतीत भर घालणारा ‘सी-वर्ल्ड’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. परंतु राज्य शासनाने या प्रकल्पासाठी जमीन खरेदी केलेली नाही, प्रकल्पाचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध केलेला नाही. सध्याची या प्रकल्पाची स्थिती पाहिली तर तो रद्द होण्याच्या मार्गावर असल्याची टीका काँग्रेस ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली.राणे म्हणाले, हा प्रकल्प राज्य शासनाचा पर्यटन विभाग, केंद्र शासनाचा पर्यटन विभाग तसेच खासगी गुंतवणूकदारांच्या सहकार्याने उभारण्यात यावा असे सांगून त्यावेळी परवानगी दिली होती. तसेच या प्रकल्पासाठी १०० कोटी रुपये जिल्ह्याच्या तिजोरीत जमा केले होते. १२०० कोटींचा असलेला हा प्रकल्प आता २००० कोटीपर्यंत गेला असेल. राज्य शासनाने अजूनही या प्रकल्पासाठी जमीन खरेदी केलेली नाही. तसेच प्रकल्पासाठी नेमका किती खर्च येणार? त्याचा प्रारूप आराखडा कसा असणार हे प्रसिध्द केलेले नाही. त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठी अटी, शर्ती याबाबत माहिती दिलेली नाही. त्याची जाहिरातही प्रसिद्ध केलेली नाही. यामुळे गुंतवणूकदार या प्रकल्पात कसे गुंतवणूक करणार? प्रकल्पाबाबत राज्य शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. सध्याची या प्रकल्पाची स्थिती पाहिली तर तो रद्द झाला असे समजायला हरकत नाही असेही राणे म्हणाले.गोरगरीब जनतेचा कॅप्टन मी अवैध मच्छिमारांचा कॅप्टन नसून, गोरगरीब जनतेचा कॅप्टन आहे. त्यामुळे माझ्यावर नाहक टीका करण्यापेक्षा आम्ही केलेल्या विकासकामांना वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतून आशीर्वाद द्या, असा टोला सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना सावंतवाडी येथे लगावला. गेल्या तीन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २७०० कोटींचा निधी आणल्याचा दावाही केसरकर यांनी यावेळी केला.
सी-वर्ल्ड प्रकल्प रद्द होण्याच्या मार्गावर
By admin | Published: July 17, 2017 2:34 AM