मुंबई: आर्थिक परिस्थिती बेताची असूनही मुलीला शिकवण्याची जिद्द. मुलीला काही कमी पडायला नको म्हणून पडतील ते कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या रिक्षा चालक फ्रान्सिस परेरा यांची मुलगी सीए परीक्षा पास झाल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. सर्व परिस्थितीचा सामना करुन स्टेफी परेरा हिने सीएची परीक्षा पास करुन वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. घाटकोपर येथील लक्ष्मीनगर मध्ये एसआरएच्या इमारतीत भाड्याच्या घरात परेरा कुटुंबिय राहतात. फ्रान्सिस हे रिक्षा चालक आहेत. तर, स्टेफीची आई ही आजूबाजूच्या सोसायटींमध्ये घरकाम करते. स्टेफी ही झुनझुनवाला महाविद्यालयात शिक्षण घेत होती. स्टेफीने सीएच्या पहिल्या दोन परीक्षा पहिल्या वेळेत पास केल्या होत्या. त्यामुळे ती पहिल्या वेळेतच सीए होईल अशी तिच्या घरच्यांची अपेक्षा होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये स्टेफी सीए फायनल परीक्षेला बसली होती. त्यावेळी तिचा पहिल्या ग्रुपमध्ये ती पास झाली. पण, दुसऱ्या गु्रपमध्ये थोडेसे गुण कमी मिळाल्याने गु्रप क्लियर झाला नाही. त्यानंतर दोन वर्षे ती दुसरा ग्रुप क्लियर करु शकली नव्हती. शेवटी स्टेफी तिच्या जिद्दीमुळे आणि घरच्यांच्या साथीमुळे सीए फायनल पास झाली. (प्रतिनिधी)
रिक्षाचालकाची मुलगी झाली सीए
By admin | Published: January 25, 2017 3:40 AM