मुंबई - संपूर्ण देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात विरोध प्रदर्शन सुरु आहे. जामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर देशभरात संतापाची लाट पसरली. CAA कायद्याविरोधात आता बॉलिवूडमधील अभिनेतेही समोर येऊन मतप्रदर्शन करत आहेत. आयुषमान खुराणा, राजकुमार राव, परिणीती चोपडा, आलिया भट्ट यांच्यासह दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनीही यावर भाष्य केलं आहे.
यामध्ये बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर यांनी ट्विट करत आंदोलनकर्त्यांना ऑगस्ट क्रांती मैदानात जमण्याचं आवाहन केलं आहे. देशभरात सुरु सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात होणारं आंदोलन का होतंय? हे जाणून घेणं गरजेचे आहे. त्यासाठी १९ डिसेंबरला ऑगस्ट क्रांती मैदानात यावं. फक्त सोशल मीडियात विरोध करण्याची वेळ आता राहिली नाही असं अख्तरने म्हटलं आहे.
फरहानच्या या ट्विटनंतर आयपीएस अधिकारी संदीप मित्तल यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, तुम्ही केलेलं ट्विट हे कायद्याचं उल्लंघन करणारे आहे याची माहिती असणं गरजेचे आहे. आयपीसी कलम १२१ अंतर्गत हा गुन्हा होऊ शकतो असं सांगत त्यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे. तुम्ही केलेलं ट्विट अनावधानाने केलं नसावं. मुंबई पोलीस आणि एनआईएचं आपल्यावर लक्ष आहे. त्यामुळे ज्या राष्ट्राने तुम्हाला सर्वकाही दिलं त्याचा विचार करा आणि कायदा समजून घ्या असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
यापूर्वी फरहानचे वडील गीतकार जावेद अख्तर यांनी एनआरसी आणि सीएए मुद्दा उचलत म्हटलं होतं की, कायद्यानुसार कोणत्याही परिस्थितीत पोलिसांना विद्यापीठाच्या परिसरात प्रवेश करताना तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय आत प्रवेश करता येत नाही. जामिया विद्यापीठात परवानगीविना विद्यापीठात प्रवेश केला गेला हा इतर विद्यापीठासाठी धोका आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर संदीप मित्तल यांनी कोणता कायदा आहे त्यातील तरतूदीनुसार स्पष्टता करावी असं सांगितले.
रविवारी संतप्त जमावाने दक्षिण दिल्लीतील पोलिस, सामान्य नागरिक आणि माध्यमांना लक्ष्य केले. जमावाने दक्षिण दिल्ली ताब्यात घेतली होती. आंदोलनकर्ते हिंसक झाल्यानंतर आणि पोलिसांशी चकमक झाली. पाच तासानंतर पोलिसांनी जामिया नगरमध्ये फ्लॅग मार्च काढला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे देखील उडविले. हिंसक जमावाने पोलिसांच्या मोठ्या पथकासह मीडियावर जोरदार हल्लाही केला.