नागरिकत्व सुधारणा विधेयक कायदा लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. यानंतर राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम या पक्षांसह अन्य पक्षांनी या कायद्याला विरोध दर्शवला होता. तसेच शिवसेनेने लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला होता. तर राज्यसभेत या विधेयकाच्या मतदानावेळी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शिवसेनेची नागरिकत्व कायद्याबाबत नक्की भूमिका काय आहे हे स्पष्ट झाले होते. त्यातच आता नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणींला शिवसेनेच्या आमदार व खासदारांनी समर्थन केलं असल्याचे समोर आले आहे.
हिंगोलीतील नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी स्वत: रस्त्यावर उतरुण सहभाग घेतला. तर शिवसेनेचे हिंगोलीतील खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)ला समर्थन असल्याचं म्हटलं आहे.
हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हिंगोली जिल्ह्यातील नागरिकत्व सुधारणा विधेयक कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या समर्थनाबाबत निघालेल्या मोर्चास उपस्थित राहु शकलो नाही याची खंत असुन या कायद्यास मान्यता मिळावी म्हणून मी लोकसभेत या कायद्याच्या समर्थनार्थ मतदान केलेले आहे. शिवसेना आधीपासून हिंदुत्ववादी पक्ष आहे, व त्यासाठी सातत्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. त्याकरिता या कायद्यास माझे पुर्ण समर्थन असल्याचे हेमंत पाटील यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत नक्की काय भूमिका आहे याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झाला आहे.