मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुन्हा एकदा लटकला आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे खातेवाटपही गुरुवारी जाहीर होऊ शकले नाही. त्यामुळे दोन्हींबाबतची अनिश्चितता कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात गेले चार दिवस खातेवाटप व विस्ताराची चर्चा सुरू आहे. गुरुवारीही वीसेएक मिनिटे हे नेते भेटले पण खातेवाटप जाहीर झाले नाही किंवा विस्तार कधी होणार हेही तिघांपैकी कोणीही सांगितले नाही.
विधिमंडळ अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होत असताना त्यापूर्वी विस्तार करावा असा शिवसेनेच्या आमदारांचा मुख्यमंत्र्यांवर दबाव आहे. मात्र, त्यांना अद्याप कोणतेही आश्वासन दिले गेले नाही. इच्छुकांनी गेले चारपाच दिवस मुंबईतच तळ ठोकला होता पण आता ते मतदारसंघात परतत आहेत. विस्तार केल्याशिवाय राष्ट्रवादीचे खातेवाटप करू नका या मागणीचा आग्रह शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धरला आहे. या गोंधळात खातेवाटप व विस्तार हे दोन्ही अडल्याचे म्हटले जाते.
विलंब साहजिक : पटेलखातेवाटपाबाबत पहिले पाच दिवस तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नव्हती. गेले तीनचार दिवस ती सुरू आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती द्यायची म्हणजे कोणाची तरी काढावी लागतील. त्या बाबत काय करायचे हे सगळे अंतिम टप्प्यात आहे. लवकरच खातेवाटप व विस्ताराचाही निर्णय होईल, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकारांना सांगितले.
आजच विस्तार : शिरसाट शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप शुक्रवारी (१४ जुलै) होईल असा दावा केला.