मंत्रिमंडळ विस्तार अन् इच्छुकांची धाकधूक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 11:37 AM2019-12-24T11:37:12+5:302019-12-24T11:39:41+5:30
तिन्ही पक्षात ज्येष्ठ सोडले तर इतरांनाही मंत्रिपदाचे स्वप्न पडू लागले आहेत.
मुंबई: नागपूर अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र अद्याप काँग्रेसच्या यादीला दिल्लीतून हिरवा झेंडा मिळाला नसल्याने विस्तार लांबणीवर पडला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याच बरोबर सत्ताधारी पक्षांतील इच्छुक आमदारांची धाकधूक वाढली आहे. तर अनेकांनी मुबईतचं मुक्काम सुरु केला आहे.
येत्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे जवळपास नक्की असल्याचे संकेत तिन्ही पक्षातील नेत्यांकडून दिले जात आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ इच्छुकांची मंत्रिपदासाठी लगबग सुरू आहे. मात्र या तिन्ही पक्षात ज्येष्ठ सोडले तर इतरांनाही मंत्रिपदाचे स्वप्न पडू लागले आहेत. विशेष म्हणजे यासाठी या आमदारांकडून वशिला लावण्याचा प्रयत्न सुद्धा केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेत कुणाला संधी द्यायची याचे सर्वस्व अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे आहे. तर राष्ट्रवादीचे भावी मंत्री पक्षप्रमुख शरद पवार ठरवणार आहे. त्याचबरोबर काँग्रेसमधून कुणाची वर्णी लागणार याचा निर्णय दिल्लीत होणार असल्याने पक्षाच्या आमदारांच्या दिल्लीवाऱ्या सुरू आहेत. तसेच तिन्ही पक्ष सोडून मित्र पक्षाला सुद्धा मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतीत महाविकास आघाडीतील सर्वच पक्षातील प्रमुख यावर निर्णय घेतील.
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सद्या एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले.