मंत्रिमंडळ विस्तार : एकनाथ शिंदेंना हवीत 'ही' खाती; फडणवीसांसोबत काय झाली चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 16:28 IST2024-12-10T16:26:13+5:302024-12-10T16:28:30+5:30
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र मंत्रिमंडळ अद्याप न झाल्याने सत्तेत कोणाला काय मिळणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष सध्या चांगली खाती मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार : एकनाथ शिंदेंना हवीत 'ही' खाती; फडणवीसांसोबत काय झाली चर्चा?
महायुतीचा खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही खात्यांसाठी आग्रही असून, दुसरीकडे अजित पवारांनीही महत्त्वाच्या खात्यासाठी जोर लावला असल्याचे समजते. उपमुख्यमंत्री शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही असून सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या भेटीत त्यांनी या मुद्द्यावर जोर दिला. दुसरीकडे अजित पवारांनाही अर्थ खात्यासाठी आग्रही भूमिका मांडली, असे सूत्रांनी सांगितले.
द न्यू इंडियन एक्स्प्रेसने शिवसेना नेत्याच्या हवाल्याने वृत्त दिले आहे. "गृह खात्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांनी महसूल, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती मागितीली आहे. त्यांनी फडणवीसांना सांगितले की, शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत ५७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ११ ते १३ मंत्रिपदे मिळणे अपेक्षित आहे", असे शिवसेनेच्या नेत्याने सांगितले.
'एकनाथ शिंदेंचा भाजपने आदर ठेवावा'
भाजपने एकनाथ शिंदेंच्या स्थानाचाही आदर ठेवायला हवा, असे हा नेता म्हणाला. "एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री घेतलेल्या मेहनतीमुळे आणि त्यांच्या कल्याणकारी योजनांमुळे महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. एकनाथ शिंदे यांना गृह खाते मिळाले नाही, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि ज्यांनी मतदान केलं आहे, त्या लोकांमध्ये चुकीचा मेसेज जाईल", असे शिवसेनेच्या नेत्याने नावाचा उल्लेख न करण्याच्या अटीवर सांगितले.
"भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी मित्रपक्षाना मंत्रिमंडळात मन मोठं करून सामावून घेतलं पाहिजे", असे या नेत्याने सांगितले.
"आम्ही दहा खाती मागितली आहेत, पण भाजपने ८ खाती देण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे आमच्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी देणे अवघड आहे. पहिल्यांदा भाजपला खातेवाटपाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट करू द्या. नंतर आम्ही बैठक घेऊन आणि हा मुद्दा सोडवू", असे अजितप पवारांनी एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.