शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन साधारणपणे एक महिना झाला आहे. मात्र, तेव्हापासून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त सापडत नव्हता. तो आता सापडला असून उद्या सकाळी 11 वाजता राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात बोलताना, उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, तर आम्हाला निमंत्रण दिले जाते. यासंदर्भात मुख्य सचिव सांगत असतात. पण अद्याप त्यांचे पत्र आलेले नाही. अद्याप अधिकृतपणे समजलेले नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त पत्रकारांशी बोलत होते.
उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार असेल तर... -अजित पवार म्हणाले, "मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातील बातम्या माध्यमांतील वेगवेगळ्या चॅनल्सवर सुरू आहेत. पण, उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, तर आम्हाला निमंत्रण दिले जाते. यासंदर्भात मुख्य सचिव सांगत असतात. पण अद्याप त्यांचे पत्र आलेले नाही. मात्र, ते उशिराही येऊ शकते. तसेच मंत्रिमंडळ केव्हा करायचे, काय करायचे, हे आपण सर्वजण बऱ्याच दिवसांपासून पाहत होते. ते लवकरच करायचे, लवकरच करायचे, अशी उत्तरे देत होते. आता मात्र, त्यांची दिल्ली वारी झाली आहे आणि आजही दोन जण नंदनवनला बसलेले होते. त्यामुळे उद्या मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता वाटते, पण अद्याप अधिकृतपणे समजलेले नाही. त्यांच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी मुंबईला बोलावलेले आहे. यावरून तशा पद्धतीची शक्यता वाटते. तसेच, उद्या कामकाज समितीची बैठक बोलावली आहे. याचा अर्थ पावसाळी अधिवेशन केव्हा घ्यायचे यासंदर्भात ती चर्चा असेल."
याशिवाय, "मी राज्याचा विरोधीपक्ष नेता आहे. या नात्याने मला माहिती पाठवण्यात आली आहे, की उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलवायची आहे. त्यासाठी विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींची नावे कळवावीत. यानंतर मी आणि जयंत पाटलांनी बसून आमची नावे कळवली आहेत. बाळासाहेब थोरातांनाही विचारले आहे, की आपली कुठली नावे असतील तर कळवा, म्हणजे ती तेथे पोहोचतील. याचाच अर्थ उद्या कामकाज समितीच्या सल्लागार समितीची बैठक त्यांना लवकरात लवकर घ्याची असल्याचे दिसते, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ही नावं चर्चेत - उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून सुधीर मुंगंटीवार, विखेपाटील आणि गिरीश महाजन यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. तर शिंदे गटाकडून, संजय शिरसाट, दादा भूसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांची नावे मंत्रीपदासाठी चर्चेत असल्याचे समजते.