महाराष्ट्र मंत्रीमंडळ विस्तार : काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्र खुला; सेनेचं प्राधान्य मुंबईलाच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 11:09 AM2019-12-30T11:09:00+5:302019-12-30T11:17:57+5:30
Maharashtra Cabinet Expansion : शिवसेनेकडून मंत्रीमंडळात मुख्यमंत्रीपदासह सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, रवींद्र वायकर, संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांची वर्णी लागली आहे. तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे देखील ठाण्याचे आहेत.
मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त लागला आहे. काँग्रेसने आपली यादी जाहीर केली असून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे देखील समोर आली आहे. मंत्रीमंडळ विस्तार आणि देण्यात आलेली मंत्रीपदे यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्रात संघटन वाढविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संधी आहे.
महाविकास आघाडीत मुंख्यमंत्रीपद मुंबईच्या वाट्याला गेले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहे. तर पहिल्या रांगेत मंत्रीपदाची शपथ घेणारे सुभाष देसाई मुंबईचेच आहेत. त्यात आता उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेकडून मुंबईकडील नेत्यांचाच अधिक वावर असणार आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेने आपली वाटचाल सुरू केली आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासाठी राज्यात पक्षविस्तार करण्यासाठी दार खुली झाली आहे. याआधी शरद पवार यांनीच स्पष्ट केले होते की, पक्षाचा विस्तार करण्यासाठीच आपण मुख्यमंत्रीपद घेत नाहीत. आता देखील राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद न घेता अधिकची मंत्रीपदे घेतली आहे. ज्याचा फायदा त्यांना राज्यात पक्षाचा विस्तार कऱण्यासाठी होणार आहे.
शिवसेनेकडून मंत्रीमंडळात मुख्यमंत्रीपदासह सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, रवींद्र वायकर यांचे मंत्रीपद निश्चित आहे. तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे देखील ठाण्याचे आहेत. एकूणच शिवसेनेने मुंबईवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. दुसरीकडे काँग्रेसने मुंबईतून वर्षा गायकवाड, अस्लम शेख तर राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांच्या रुपाने मंत्रीपदे दिली आहेत.