मंत्रीमंडळ विस्तार : महाविकास आघाडीत मित्रपक्ष उपेक्षितच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 11:22 AM2019-12-30T11:22:53+5:302019-12-30T11:36:43+5:30
बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची मंत्रीपद मिळण्याची शक्यता सध्या तरी धुसर झाली आहे.
मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन पक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडी तयार करून सरकार स्थापन केले. निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेले निकालानंतर एकत्र आले. यात शिवसेनेसोबत मित्रपक्ष आले नसले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती. त्यामुळे राज्याच्या मंत्रीमंडळात आपलीही वर्णी लागेल अशी आशा मित्रपक्षांना होती. मात्र पहिल्याच मंत्रीमंडळ विस्तारात मित्रपक्ष उपेक्षित राहिले आहेत.
महाआघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, प्रहार संघटना आणि शेतकरी कामगार पक्षांनी साथ दिली. त्यामुळे या पक्षांच्या नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता होती. मात्र ही शक्यता आता मावळली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अनुकूल वातावरण होते. त्या परिस्थितीत देखील या घटक पक्षांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साथ दिली होती.
पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आघाडीला दोन्ही निवडणुकीत विनाअट पाठिंबा दर्शविला होता. तर भाजपने अजित पवारांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर देखील बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शविला होता. तर राजू शेट्टी देखील शेतकरी प्रश्नी आघाडीत सामील झाले होते. शेकापमुळे आघाडीला अनेक जागांवर फायदाच झाला. घटक पक्षांनी अडचणीच्या काळातही आघाडीची साथ सोडली नाही. त्यामुळे त्यांना याचे फळ मिळण्याची शक्यता होती. मात्र बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची मंत्रीपद मिळण्याची शक्यता सध्या तरी धुसर झाली आहे.