नाशिक : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्यात केला जाणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.भाजपा महाराष्ट्रातही गुजरातच्या धर्तीवर पक्षाची बांधणी करणार असून, ८० हजार बूथ प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक बूथवर २५ युवकांची नेमणूक करण्यात येणार असून, त्यांच्यावर मतदार यादीचे समोरील व मागच्या बाजूला असलेल्या ६० मतदारांची जबाबदारी सोपविण्यात येणार असून, या युवकांना पेजप्रमुख म्हणून संबोधण्यात येणार असल्याची माहितीही दानवे यांनी दिली.नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. याविषयी केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितच निर्णय घेणार आहे. परंतु, कोकणात कोणताही प्रकल्प होत असताना तेथील काही पक्ष कायम विरोध करीत असल्याची टीका दानवे यांनी केली.युतीबाबत चर्चा नाहीशिवसेनेसोबत युतीविषयी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. भाजपा संघटनात्मक विचारधारेचा पक्ष असून युतीसारखा महत्त्वाचा निर्णय कोणताही एक नेता घेऊ शकत नाही. त्यामुळे युतीची चर्चा करण्यासाठी जाणार असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारल्याचे वृत्त केवळ माध्यमांनी तयार केले असून, मुनगंटीवार यांनी ठाकरे यांची वेळच मागितली नसल्याचा खुलासा दानवे यांनी केला. प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठापक्षाने सरपंच पदापासून केंद्रीय मंत्री आणि आता प्रदेशाध्यक्षासारखी महत्त्वाची पदे सोपविली आहेत. त्यामुळे आपल्याला कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे सांगत पक्षाचा प्रदेशाध्यक्ष हा मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा असल्याचा दावा दानवे यांनी केला.
पुढील महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 4:17 AM