मुंबई : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद आणि लातूर या तीन दुष्काळग्रस्त जिल्ह्यांत भीषण परिस्थिती असताना, सरकार उदासीन असल्याची टीका होऊ लागल्याने, सर्व मंत्र्यांनी एक दिवसाचा दौरा करावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यानुसार आता मंत्रिमंडळातील सदस्य मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत.मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्र्यांनी स्वत: गेले पाहिजे, अशी भूमिका घेत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाच दिवशी सर्व मंत्र्यांनी त्या भागात जावे, असे सांगितले. त्यानुसार महसूलमंत्री एकनाथ खडसे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या चौघांनी एकत्र बसून मंत्र्यांचे दौरे निश्चित केले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात हा दौरा असेल. दौऱ्यावर जाणारे मंत्री प्रत्येक तालुक्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतील, दुष्काळ निवारणासाठी कार्यरत यंत्रणांशी चर्चा करतील, चारा छावण्यांना भेट देतील, पाणी समस्येचा आढावा घेतील, तसेच शेतकरी, नागरिकांना भेटून नेमक्या समस्या जाणून घेऊन, त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करतील. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. दुष्काळ निवारणाच्या मुद्द्यावर सरकारची कसोटी लागणार आहे, त्यापूर्वी हा दौरा होणार आहे.अधिकाऱ्यांविरुद्ध मंत्र्यांची तक्रार!दुष्काळ निवारण कार्यात अधिकारी सहकार्य करीत नाहीत, अशी तक्रार काही मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत केली. त्यावर भीषण दुष्काळी परिस्थिती असतानादेखील यंत्रणा प्रभावीपणे काम करीत नसेल, तर कठोर कारवाई करावी लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला, अशी माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)उशिरा सुचलेले शहाणपणअधिवेशनाच्या तोंडावर राज्यातील मंत्री दुष्काळ दौऱ्यांवर जात असून, हे दौरे म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. तीन महिन्यांपूर्वी असे दौरे केले असते, तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता, असे मुंडे म्हणाले.शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांवर नाराजजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधल्याचे समजते. ‘सरकारचे पैसे वाचविणारे उपाय मी अनेकदा सुचवितो, पण त्याची दखल घेतली जात नाही. अधिकारीही ऐकत नाहीत. मी तुम्हाला १६ पत्रे दिली, पण त्याची दखल घेतली गेली नाही,’ अशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे बघून केली. काही पत्रांच्या प्रतीही त्यांनी दाखविल्या. शिवसेनेचे दुसरे मंत्री रवींद्र वायकर यांनीही अधिकारी ऐकत नसल्याचा सूर लावला, असे सूत्रांकडून समजते.प्रत्येक बैठकीचा एक डेकोरम असतो, तो पाळला गेला पाहिजे. आपल्याला काही सांगायचे असेल, तर आपण मला नंतर भेटू शकता. इथे बोलणे उचित नाही, अशी समज मुख्यमंत्र्यांनी शिवतारे यांना दिल्याचे समजते. भाजपा-शिवसेना एकमेकांवर टीका करीत असले, तरी मंत्रिमंडळ त्या वादापासून दूर असून, आमच्यात समन्वय असल्याचे मुख्यमंत्री नेहमीच सांगत आले आहेत. त्याला आज तडा गेला.