मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर मोठे राजकीय नाट्य घडत राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला विस्तार अखेर चौतिसाव्या दिवशी होणार आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे.मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणात सोमवारी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठविली आहे. शामियाना उभारून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांच्या दिमाखदार शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला होता.शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची नावे मुंबईतच अंतिम झाली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात रविवारी दिल्लीला रवाना झाले. त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. त्यानंतर, जवळपास दीड तास बैठक झाली. सोनिया गांधी यांची भेट झाल्यानंतर थोरात यांनी पुन्हा मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी जाऊन मंत्रिपदाच्या नावांबाबत चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत काँग्रेसच्या बैठका सुरू होत्या. त्यानंतर, दिल्लीतूनच नावे निश्चित झालेल्यांना संबंधित नेत्यांना फोन करणे सुरू झाले होते.राष्ट्रवादी काँग्रेसने आपली यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविली आहे, शिवाय निवड झालेल्या नेत्यांचे प्रोफाइल आणि फोटोदेखील राष्ट्रवादीने तयार करून रात्री पाठविणे सुरू केले होते. राष्ट्रवादीकडून सुरुवातीला जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती.शिवसेना, काँग्रेसमधील संभाव्य नावेशिवसेना : अनिल परब, उदय सामंत, शंकरराव गडाख, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, शंभूराजे देसाई, दादा भुसे, बच्चू कडू, राजेंद्र पाटील यड्रावकर. याशिवाय रवींद्र वायकर, सुनील प्रभू, सुनील राऊत, दीपक केसरकर, प्रकाश आंबिटकर, आशीष जयस्वाल, तानाजी सावंत यांचीही नावे चर्चेत आहेत.काँग्रेस : अशोक चव्हाण, के. सी. पाडवी, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, वर्षा गायकवाड, सुनील केदार, असलम शेख, यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजित कदमराष्ट्रवादी कॉँग्रेसचे संभाव्य मंत्रीअजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिक, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे, संजय बनसोडेविधानसभेच्या सदस्यांची संख्या २८८ आहे. त्यानुसार, ४३ मंत्री घेतले जाऊ शकतात. त्यापेक्षा जास्त मंत्र्यांना घेता येत नाही.सोमवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्री, तर काँग्रेसचे ८ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री यांना शपथ देण्याचे नियोजन केल्याचे राजभवनातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेर आज विस्तार; कोण असणार ठाकरेंचे शिलेदार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 5:52 AM