Maharashtra Cabinet Meeting : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली शिवभोजन थाळी (Shivbhojan Thali) बंद होणार अशी चर्चा सुरू होती. मात्र, ही शिवभोजन थाळी यापुढेही सुरू राहणार आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली. काही निर्णयांमध्ये बदल केला. त्यामुळे शिवभोजन थाळीदेखील बंद करणार, अशी चर्चा सुरु झाली. पण, आज शिंदे-फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठक आज पार पडली. या बैठकीत ठाकरे सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आढावा घेण्यात आला. शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचे अनेक सत्ताधारी नेत्यांनी आरोप केले होते. या आरोपांमुळे ही योजना बंद होईल, अशी शक्यता होती.
पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ही थाळी सुरू राहिल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत ही शिवभोजन थाळी योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे फडणवीसांनी दिलेला शब्द पाळल्याची चर्चा सुरू आहे. आता प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा घेणार आढावा घेणार आहेत.