सांगली : राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या विस्तारातही सांगली जिल्ह्याला ठेंगा दाखवण्यात आला. जिल्ह्यात भाजप-शिवसेनेला आठपैकी पाच जागा मिळूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सांगलीला स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच सांगली जिल्हा मंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे पालकमंत्रीही आयात करावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालापासूनच शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक व मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांची भाजपच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार, अशी चर्चा होती, मात्र त्यांचा समावेश झाला नाही. आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याने आ. नाईक, आ. खाडे आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आठवड्यापासून मुंबईत तळ ठोकला होता. दोघांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने मुंबईला रवाना झाले होते. मात्र विस्तारातही जिल्ह्याच्या पदरी निराशा पडली. भाजपमधील अंतर्गत वादामुळे जिल्ह्याचे मंत्रीपद हुकल्याचे बोलले जात आहे. यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्याने आता पालकमंत्रीपदी इतर जिल्ह्यातील मंत्र्यांची नियुक्ती होणार आहे. जिल्ह्याला गेल्या दोन महिन्यांपासून पालकमंत्री न मिळाल्याने अनेक विकासकामे ठप्प झाली आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीची सभा झाली नसल्याने विकास कामांना मंजुरी रखडली आहे. ग्राहक परिषद, संजय गांधी व श्रावणबाळ निराधार योजना, दक्षता समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यांची नियुक्तीही पालकमंत्र्यांअभावी लांबणीवर पडली आहे. राज्यात भाजप, सेना युती होणे महत्त्वाचे होते. राज्याला स्थिर सरकारची गरज होती, ती आता पूर्ण झाली आहे. भविष्यात जिल्'ाला स्थान मिळणार आहे, यात कोणतीही शंका नाही. नागपूर अधिवेशनानंतर जिल्'ातील सदस्य मंत्री होतील. मात्र थोडी प्रतीक्षा करायला हवी. - शेखर इनामदार, सांगली शहर जिल्हाध्यक्ष, भाजप. पहिल्यादाच सांगलीला स्थान नाही राजकीयदृष्ट्या आघाडीवर असणाऱ्या सांगलीला पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. यापूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबरच जिल्ह्यातील सदस्यांचा शपथविधी होत असे. नागपूरच्या अधिवेशनानंतर जिल्ह्याला स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंत्रिमंडळ विस्तारातही सांगलीला ठेंगा
By admin | Published: December 06, 2014 12:23 AM