नागपूर : नववर्षाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा केले आहे. तसेच, पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील, ती पार पाडेन असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.
आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावेळी मीडियासोबत बोलताना अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असून लवकरच नववर्षाच्या आधी होईल, असे सांगितले. यावेळी अजित पवार यांना नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून तुमची वर्णी लागणार का? असा सवाल विचारला असता यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणास नकार दिला. मात्र, पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेते जी जबाबदारी देतील, ती पार पाडेन, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट मिळाल्याबद्दल सुद्धा कोणतीही दिली नाही.
याशिवाय, शेतकरी कर्जमाफीची आज घोषणा होणार नाही का? असा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले, 'आज काहीही होऊ शकते. शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार की नाही, हे माहीत नाही. पण माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता शेतकऱ्यांबाबत ते सकारात्मक निर्णय घेऊ शकतात.' त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे संकेत आहेत.
देशात ठिकठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरु आहे. याविषयी बोलताना अजित पवार यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करायचा असेल तर शांतेच्या मार्गाने करावा, असे आवाहन करत लोकशाहीत शांततेत आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. याशिवाय, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून कोणीही राजकरण करू नये, असेही अजित पवार म्हणाले.