अरुणकुमार मेहत्रे,
कळंबोली-सिडको वसाहतीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे जाळे पसरविण्यात येणार आहे. त्या दृष्टिकोनातून कामाला सुरूवात झाली आहे. आॅगस्ट महिन्यापूर्वी प्रत्यक्ष काम पूर्ण होवून दिवाळीपर्यंत ही यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा सिडकोच्या टेलिकॉम विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेला सुध्दा कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच गुन्हेगारीवर आळा घालण्यास सोयीस्कर होणार आहे.सिडकोने नवी मुंबईबरोबरच पनवेल विभागात नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या वसाहती विकसित केल्या. या ठिकाणची लोकसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. पाच ते सहा लाखांच्या या लोकवस्तीत इमारतीबरोबरच मॉल, शोरूम, शाळा, लहान-मोठे उद्योग विकसित झाले आहेत. या परिसरातून महामार्ग जातात त्याचशिवाय उपनगरीय रेल्वेसेवा आणि आता मेट्रोचे काम सुरू आहे. सिडको नोडला लागूनच प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ येत आहे. नवीन पनवेल प्रकल्पामुळे या विभागाला महानगराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर काही समस्या, अडचणी आणि प्रश्नांनी डोके वर काढले आहे. त्यामध्ये सुरक्षिततेचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. या व्यतिरिक्त कायदा आणि सुव्यवस्था राखणे अवघड जात असल्याची वस्तुस्थिती आहे. खारघर ही सायबर सिटी म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर शैक्षणिक हब म्हणूनही खारघरचा नावलौकिक वाढत चालला आहे. त्यामुळे साहजिकच या परिसरात वेगवेगळ्या देशातून आलेले नागरिक राहतात. स्टील मार्केट, एमआयडीसीमुळे उद्योगाचे जाळे पसरले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून सिडकोने पावले टाकली आहेत. सर्व नोडमध्ये सोनसाखळी चोरी, घरफोड्या, बतावणी करून लूट, चोऱ्यामाऱ्या, लूट, दरोडा यासारख्या घटना घडतात. कित्येक चोर चोरी करून पळून जातात त्याचा तपास किंवा उलगडा करण्याकरिता पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. त्याचबरोबर वाहनांची संख्या सुध्दा या भागात वाढत चालली आहे. त्यांच्यावर वॉच ठेवण्याकरिता कोणतीही यंत्रणा सिडको नोडमध्ये नाही. त्यामुळे सर्व वसाहतीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय सिडकोच्या बोर्डाने घेतला होता. त्याकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून सुध्दा मागणी झाली होती. या मागणीची दखल घेत सिडकोने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकरिता निविदा प्रसिध्द केली. त्यानंतर सर्व प्रक्रि या सोपस्कर करून विप्रो कंपनीला काम दिले आहे. सध्या कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, खारघरमध्ये केबल टाकण्याचे काम सुरू आहे.