नवी मुंबई : नागरिकांचा विरोध डावलून सिडकोने सानपाडा सेक्टर ८ मध्ये मस्जीदसाठी भूखंडाचे वितरण केले आहे. यामुळे संतप्त रहिवाशांनी मोर्चा काढून सायन - पनवेल महामार्ग रोखला. सिडको कार्यालयावर धडक देवून भूखंडाचे वितरण थांबविण्याची मागणी केली आहे. दिवसभर सानपाडा बंद करण्यात आला होता. सिडकोने सानपाडा सेक्टर ६ मध्ये मस्जीदसाठी एक भूखंड दिला आहे. त्याच संस्थेने सेक्टर ८ मध्ये भूखंड देण्याची मागणी १९९८ पासून केली आहे. परंतु याला रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे. परंतु विरोध डावलून भूखंडाचे वितरण केल्यामुळे नागरिकांनी डिसेंबर २०१२ मध्ये आंदोलन केले. मस्जीदला विरोध नाही. परंतु या परिसरामध्ये मुस्लीम कुटुंबीयांची ६५ घरे आहेत. शिवाय संस्थेला दुसरीकडे भूखंड दिला असल्याने सर्वपक्षीय रहिवासी रस्त्यावर उतरले होते. यानंतर लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी केल्यानंतर सदर संस्थेचे भूखंड वाटप रद्द करण्याचे व इतर ठिकाणी देण्याचे निश्चित करण्यात आले. याविषयीचा लेखी करार करण्यात आला होता. परंतु नंतर संस्थेने न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाने त्यांना भूखंड देण्याची सूचना सिडको प्रशासनाला केली. नागरिकांचा विरोध डावलून पुन्हा तोच भूखंड दिल्याने रहिवाशांमध्ये पुन्हा असंतोष निर्माण झाला आहे. अखिल सानपाडा रहिवासी महासंघ, शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजपा, काँगे्रस व इतर सर्व संघटनांनी सिडकोच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. जवळपास दोन हजार नागरिकांनी हुतात्मा बाबू गेणू मैदानापासून मोर्चा काढला. सायन - पनवेल महामार्ग काही वेळ रोखला होता. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावरून रहिवाशांनी सिडको कार्यालयावर धडक दिली. नागरिकांचा विरोध डावलून भूखंड वाटप केल्यामुळे रहिवाशांनी सिडकोचा निषेध केला. रहिवाशांच्या शिष्टमंडळाने सहआयुक्त राजेंद्र चव्हाण यांची भेट घेतली. नागरिकांमध्ये तीव्र असंतोष असून लोकभावनेचा विचार करून भूखंड वाटप रद्द करावे अशी मागणी यावेळी करण्यात आला. प्रशासनाने हा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने सद्यस्थितीमध्ये कोणताही ठोस निर्णय घेता येत नाही. परंतु संबंधित संस्थेचे पदाधिकारी व सानपाडा रहिवासी महासंघाची बैठक घेवून याविषयी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेविका संगीता बोऱ्हाडे, शिवसेनेचे सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, ऋचा पाटील,दीपक पवार, सानपाडा येथील जयंत नाईक, अजित सावंत, बाळासाहेब महाले, मंदाताई कुंजीर, प्रकाश पाटील, संतोष पाचलग,मिलिंद सूर्याराव व सानपाडामधील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सानपाडावासीयांचा सिडकोवर मोर्चा
By admin | Published: July 22, 2016 1:45 AM