ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ६ - कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची युती झाली आहे. शिवसेनेचे संख्याबळ पाहता त्यांचाच महापौर होण्याची शक्यता आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष कोणत्या पक्षाचे असतील याचा निर्णय आज रात्री उशीरा होणाऱ्या सेना-भाजपाच्या बैठकीत ठरेल. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांच्यात आज बैठक झाली. दोघांमध्येही सकारात्मक चर्चा झाल्यानंतर, भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी सेना भाजप युतीवर शिक्कामोर्तब केले. भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सेना-भाजप युती झाल्याचे पत्रक काढत यास दुजोरा दिला. उद्या महापौर पदाचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे सेना-भाजपाच्या निर्णयावर सर्वांचे लक्ष होते.
कल्याण-डोंबिवलीच्या निवडणूक निकालानंतर महापालिकेत आपलाच पक्ष सत्तेवर बसेल एवढंच नव्हे तर महापौरपदाची माळही आपल्याच गळात पडेल असा दावा भाजपने केला होता. परंतु, यानंतर शिवसेनेने टोकाची भूमिका घेतल्याने मनसे कोणाला कौल देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. तेव्हा, सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि मनसेची युती व्हावी यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य यांनी प्रयत्न चालविले होते. परंतु, मनसेने दहा जणांचा वेगळा गट स्थापन केला आणि कोकण आयुक्तांना याबाबतचे पत्रही सोपविले. तेव्हा, मनसेला आपल्या बाजुने खेचण्यात कोण यशस्वी होणार ? याबाबत शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ निर्माण झाली होती.
कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेत शिवसेना ५२, भाजपा ४२, मनसे ९, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, एमआयएम व बसपा प्रत्येकी १ व अपक्ष ९ नगरसेवक आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी १२२ जागांसाठी झालेल्या मतदानात सुमारे ४७ टक्के मतदान झाले होते.