लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपुरात बनविण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामाची गांभीर्याने चौकशी करण्यात येईल. निकृष्ट दर्जाचे काम आढळल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल. सिमेंट रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार विजय दर्डा यांना दिले आहे. नागपूरातील निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या संदर्भात दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. विजय दर्डा म्हणाले की, नागपुरातील सिमेंटच्या रस्त्याच्या कामात नियमानुसार ‘एम-४५ ग्रेड’ काँक्रिटचा उपयोग होणे गरजेचे होते. परंतु ‘एम-३०’ व ‘एम-३५’ काँक्रिटचा वापर करण्यात आला आहे. यात कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. चर्चा अशीही आहे की, या कामात काही नामांकित लोक जुळले असल्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जे रस्ते बनलेले आहेत, त्यांची कोर कटिंग करून प्रमाणित लेबॉरेटरीमध्ये तपासणी केल्यास रस्त्याची गुणवत्ता लक्षात येईल. जे रस्ते बनविण्यात आले आहेत, ते समतोलसुद्धा नाहीत. त्यामुळे वाहन चालविणे त्रासदायक ठरत आहे. रस्त्याची तपासणी करणारे अधिकारीसुद्धा याकडे दुर्लक्ष करीत आहेत. विजय दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, तुम्ही व नितीन गडकरी यांनी शहराला सिमेंट रस्त्यांची भेट दिली आहे. शहरात किमान तीन हजार कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम सुरू आहे. काही लोक आपल्या स्वार्थासाठी दर्जेदार रस्ते बनविण्यास अडचणी आणत आहेत. त्यामुळे आपण स्वत: याकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे. मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक रस्त्याची चौकशी करण्यात येईल. रस्त्याची कोर कटिंग टेस्टिंग होईल आणि जे कुणी यात दोषी आढळेल त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. ज्या रस्त्याचे काम निकृष्ट आढळेल, त्या रस्त्याच्या ठेकेदाराला पुन्हा रस्ता बनवावा लागेल. निष्काळजी, दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही. निकृष्ट काम करणाऱ्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात येईल, त्यांना ब्लॅक लिस्टेड करण्यात येईल.
नागपुरातील सिमेंटच्या रस्त्यांची होणार चौकशी
By admin | Published: May 25, 2017 1:38 AM