मुंबई : दरवर्षी पर्जन्य नक्षत्र आणि त्यांची वाहने यावरून पंचांगात पावसाचा अंदाज दिलेला असतो. अर्थात या अंदाजाला वैज्ञानिक आधार नसला तरी हा अंदाज पर्जन्य नक्षत्राच्या वाहनांप्रमाणे जुन्या ठोकताळ्यांवर आधारित असतो. या अंदाजाप्रमाणे या वर्षी पाऊस चांगला सरासरीएवढा परंतु अनियमित पडेल, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.पावसाविषयी वेधशाळेने व्यक्त केलेला अंदाज हा वैज्ञानिक निकषांवर आधारित असतो. तो अधिक विश्वासार्ह असावयास हवा आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात हवामानाचा अंदाज बऱ्याच प्रमाणात अचूक येतो; कारण तेथील वेधशाळांकडे अत्याधुनिक उपकरणे आहेत. वेधशाळांची संख्याही जास्त आहे. तसेच तेथील वेधशाळांकडे मागच्या अनेक वर्षांचा जुना तपशील उपलब्ध आहे, आपल्याकडे या गोष्टींची कमतरता आहे. तसेच भौगोलिकदृष्ट्या आपल्याकडील पावसाचा अंदाज वर्तविणे तसे खूप कठीण आहे, हेही खरे आहे. परंतु डॉप्लर यंत्रणा उभारणीविषयी चाललेली चालढकल पाहता येथे याविषयी इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे आढळते, अशी खंत सोमण यांनी व्यक्त केली. अशा यंत्रणा उभारणीकडे जास्त गांभीर्याने पाहायला हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
पंचांगाप्रमाणे या वर्षी चांगला; परंतु अनियमित पाऊस!
By admin | Published: April 25, 2017 2:34 AM