मनीषा म्हात्रे/ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 16 - कोलकाता आणि चीनपाठोपाठ प्लास्टिकच्या अंड्यांचे जाळे आता मुंबईतही पसरलेले दिसतेय. मुंबईतील भांडुपमध्ये प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याचा अनुभव एका ग्राहकाला आला आहे. त्यामुळे भांडुप परिसरात अशी बनावट प्लास्टिकची अंडी विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आठवड्याभरापूर्वी विक्रोळीतील एका गृहिणीलाही याचा अनुभव आला होता. सध्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भांडुपमधल्या सर्वोदयनगर परिसरातील राजेश सावंत यांना हा अनुभव आला आहे. त्यांनी रविवारी 6 अंडी खरेदी केली. मात्र, अंडी लवकर फुटत नव्हती. त्यामुळे त्यांना संशय आला. प्रयत्नानंतर अंड फुटले, मात्र ऑम्लेट करताना त्याला नेहमीसारखा वास आला नाही. तसंच त्याची चवही वेगळी लागल्याने त्यांची शंका आणखी बळावली. त्याचबरोबर अंड्याच्या टरफलातून प्लास्टिकच आवरण निघाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे. त्यांनी याबाबत दुकानदारालाही कळविले आहे. यापूर्वी डोंबिवलीतील ग्राहक अमेय गोखले यांच्या पाठोपाठ विक्रोळीत राहणाऱ्या श्रद्धा बेटा यांनाही हा अनुभव आला होता. श्रद्धा बेटा यांना ही प्लास्टिकची अंडी खाल्ल्यामुळे त्रास झाला होता. मात्र तक्रारीसाठी त्या पुढे आल्या नाहीत. या घटनेमुळे मुंबईकरांवर प्लास्टिकच्या अंड्यांचं संकट ओढावले आहे.
कोलकाता, चीनपाठोपाठ मुंबईतही आता प्लास्टिकची अंडी
By admin | Published: April 16, 2017 6:25 PM