'ऑक्सिजन टँकर पाठवलाय...'; अजित पवारांचा एक फोन अन् रोहित पाटील मध्यरात्री पोहोचले मदतीला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 01:48 PM2021-05-02T13:48:03+5:302021-05-02T13:50:10+5:30
Coronavirus In Maharashtra: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका फोनवर राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा सुपुत्र रोहित पाटील मध्यरात्री रुग्णांच्या मदतीसाठी धावून गेले.
Coronavirus In Maharashtra: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानं अनेकांचे जीव गेल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले जात आहेत. पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी मतदार संघात अकराशे बेडचं कोरोना सेंटर सुरू केल्याचं उदाहरण ताजं असतानाच राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (A call from Ajit Pawar and Rohit Patil reached for help at midnight for oxygen supply)
आनंद महिंद्रांचं मोठं पाऊल! आता घराघरात पोहोचणार ऑक्सिजन, आणली 'Oxygen on Wheels' योजना
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका फोनवर राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा सुपुत्र रोहित पाटील मध्यरात्री रुग्णांच्या मदतीसाठी धावून गेले. रात्री साडेबाराच्या सुमारास अजित पवार यांनी रोहित पाटील यांना फोन केला होता. "रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वत: थांबून तो उतरवून घे', असं अजित पवार यांनी रोहितला सांगितलं. त्यानंतर रोहित पाटील स्वत: ग्रामीण रुग्णालयात रात्री पोहोचले आणि ऑक्सिजनची व्यवस्था करुन दिली.
रोहित पाटील यांच्या तासगाव तालुक्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोना रुग्णांवर सरकारी तसचे खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे तासगाव तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यासाठी सरकारकडे ऑक्सिजनची मागणी केली होती. याची दखल घेत अजित पवार यांनी तासगाव तालुक्याला ऑक्सिजन टँकर पुरवला. रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून तासगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी ५६ ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.