मुंबई/औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी मुंबई-कोकणासह राज्यातील सात जिल्ह्यांत ‘बंद’ची हाक दिली आहे. मंगळवारी मराठवाड्यात बंदला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड झाली. सहा आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. जमावाला पांगविण्यास घनसावंगीत पोलिसांना गोळीबार करावा लागला.मराठवाड्यात आठही जिल्ह्यांत दगडफेक, जाळपोळ, तोडफोड व मुख्यमंत्री व सरकारचे पुतळे जाळण्याचे प्रकार घडले. सोमवारी गोदावरीत जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी कायगाव येथे शिवसेना नेते खा. चंद्रकांत खैरे यांना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. काँगे्रसचे आमदार सुभाष झांबड यांनाही पिटाळून लावले. कायगाव येथे बंदोबस्तादरम्यान पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. बस वाहतुकीसह शाळा-महाविद्यालये आणि बाजारपेठ बंद होती. गोदावरी नदीच्या पुलावर सुरू असलेले आंदोलन स्थगित केल्याचे सायंकाळी मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केले.मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मंगळवारी दुपारी मुंबईत शिवाजी मंदिर येथे घेतलेल्या बैठकीत बंदचा निर्णय जाहीर केला. स्कूलबस, दूध टँकर, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहने व सेवांना बंदमधून वगळण्यात आले आहे.समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले, की मुंबईत बंदची अंमलबजावणी करताना कोणत्याही प्रकारची हिंसा घडू नये, याची काळजी घ्यावी. शांततेच्या मार्गाने बंद केला जाईल. कोणत्याही प्रकारची तोडफोड आणि जाळपोळ करू नये.मराठा क्रांती मोर्चाची बंदसाठी आचारसंहिताबंद शांततेत पार पाडावा, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने कार्यकर्त्यांसाठी आचारसंहिता लागू केली आहे.कुठेही तोडफोड, जाळपोळ करू नये. प्रक्षोभक व्हिडीओ व्हायरल करू नये.सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.हे आंदोलन सरकारविरोधी असून, त्यास जातीय रंग देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडून मुंबईसह सात जिल्ह्यांत ‘बंद’ची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:43 AM