ऑनलाइन लोकमतठाणे, दि.13 - मीरा रोड येथील कॉल सेंटरवरील धाड प्र्रकरणातील तिघा आरोपींच्या पोलीस कोठडीत एक दिवसाची वाढ झाली आहे. यातील हैदरअली अयुब मन्सुरी याच्याकडून एक इकोस्पोर्ट फोर्ड ही कार जप्त केली असून त्याच्या मीरा रोड येथील सदनिकेचीही चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ने मीरा रोड येथे ५ आॅक्टोबर रोजी धाड टाकून ७२ जणांना अटक केली. त्यांच्यापैकी हैदरअली मन्सुरी, शाहीन ऊर्फ हमजा बालेसाब (यम बाले हाऊस या कॉल सेंटरचा जागामालक), लोकेश शर्मा (अकाउंटंट) या तिघांविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना ठाणे न्यायालयाने सुरुवातीला १० आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर, १३ आॅक्टोबरपर्यंत त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ झाली. गुरुवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने त्यांना १४ आॅक्टोबरपर्यंत वाढीव पोलीस कोठडी दिली. दरम्यान, हैदरअली याच्या मीरा रोड येथील घराजवळील ११ लाख ५० हजारांची कार जप्त केली असून त्याच्या ८० लाखांच्या सदनिकेचीही चौकशी करण्यात येत आहे. ही सदनिका त्याने कॉल सेंटरमधील ‘कमाई’तून घेतली आहे किंवा कसे, याचीही चौकशी सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या पथकाकडून करण्यात येत आहे. तर, यातील आणखी एक आरोपी सुफियाअली याच्याही पोलीस कोठडीची मुदत संपल्याने न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी दिली आहे.हवालातून दीड कोटीचा व्यवहारकॉल सेंटरमधील फसवणुकीच्या पैशांतून मीरा रोड ते अहमदाबाद आणि अमेरिका ते अहमदाबाद असे हवाला मार्गाने सुमारे दीड कोटीचे व्यवहार झाल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. अर्थात, यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी याबाबत चौकशी सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
कॉल सेंटर धाड - तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
By admin | Published: October 13, 2016 9:24 PM