ऑनलाइन लोकमत
अंबरनाथ, दि. 5 - ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवरुन कॅमेरा मागवला असता त्याऐवजी निरमा साबण पाठवून ग्राहकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अक्षय असं या ग्राहकाचं नाव असून तो अंबरनाथच्या लोकनगरी भागात राहतो. फ्लिपकार्टवरुन त्याने तब्बल 31 हजारांचा कॅमेरा मागवला होता. मात्र आलेल्या कुरिअरमधून कॅमेराऐवजी साबण निघाल्याने आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.
अक्षयला फोटोग्राफीत करिअर करण्याची इच्छा असल्याने त्याचा भाऊ किरण आणि कुटुंबाने गुढीपाडव्याच्या दिवशी फ्लिपकार्टवरुन एसएलआर कॅमेरा बुक केला होता. कॅमेरा बूक करत असतानाच त्यांनी पेमेंटही केलं होतं. कुरिअर आल्यावर उत्सुकतेपोटी कॅमेरा पाहण्यासाठी ते उघडले असता त्यांना धक्काच बसला. कारण त्यामध्ये कॅमेरा नाही तर निरमा साबणाच्या वड्या होत्या.
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार केली. मात्र कुरियर कंपनीसह फ्लिपकार्टनंही या प्रकरणी हात वर केले आहेत. त्यामुळे आता दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
आपल्या घरी कॅमेराची डिलीव्हरी देण्यासाठी आलेला कुरिअर बॉय खूप घाई करत होता. विशेष म्हणजे आपल्याकडे इतक्या गडबडीत त्याने पार्सल सोपवलं की सहीसुद्धा घेतली नाही असा दावा किरणने केला आहे. दरम्यान तक्रार करण्यासाठी फोन केला असताना तो तरुण आपल्याच मुलाला धमक्या देत असल्याचा आरोप किरणच्या आई मंदा पाटे यांनी केला आहे.