मुंबई : एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारातील फेऱ्यांचे सुसूत्रीकरण करतानाच त्यातील फेऱ्या अन्य आगारांत वर्ग करण्यात येत आहेत. त्यामुळे चालक-वाहकांची यात फरफट होत असल्याने त्याला विरोध करत मुंबई सेंट्रल आगारातील एसटीच्या ३२0 चालक-वाहकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून, येत्या ४ आॅक्टोबरपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. वाढलेली आगारे, त्यामुळे मनुष्यबळाबरोबरच देखभाल-दुरुस्तीचा होणाराही खर्च पाहता अनेक आगार तोट्यात असल्याचे कारण पुढे करत महामंडळाने सुसूत्रीकरणाचे धोरण अवलंबले आहे. एकाच ठिकाणाहून लांब पल्ल्याच्या फेऱ्या एकमेकांना समांतर धावत असल्याने अशा फेऱ्या कमी करणाऱ्यावर महामंडळाकडून भर दिला जात आहे. यासाठी ३0 किलोमीटरच्या आत एकापेक्षा जास्त आगार असल्यास आणि १00पेक्षा कमी फेऱ्या असल्यास तसे आगार टप्प्याटप्प्याने बंद करून त्यांतील फेऱ्या अन्य आगारात वळत्या करण्यात येत आहेत. आतापर्यंत ११ सातारा फेऱ्या या सातारा आगाराकडेही वर्ग करतानाच हैदराबाद, विजापूर, बार्शी, धुळे, मुक्ताईनगर, शिर्डी, अहमदनगर या गाड्याही बंद करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ३२0 चालक-वाहकांपैकी २0८ चालक-वाहकांचे रजेचे अर्ज स्वीकारण्यात आले. या उपोषणाला महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आला आहे. कामगारांच्या आणि प्रवाशांच्या न्याय हक्कासाठी हा लढा आहे. चालक-वाहकांनी रजेचे अर्ज दिले असून ते स्वीकारण्यात येत असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप जगताप यांनी दिली. (प्रतिनिधी)
एसटीचे चालक-वाहक उपोषण पुकारणार
By admin | Published: October 03, 2016 5:39 AM