मुंबई : बदलापूरमध्ये अत्यंत विकृत घटना घडली. या दुष्कृत्य आणि विकृती विरोधात उद्रेक उसळला, ते आंदोलन राजकीय स्टंट वाटणे म्हणजे विकृत मानसिकता आहे. हे विकृत नराधमांचे पाठीराखे आहेत, अशा शब्दात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले.
शिवसेना भवन येथे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, की महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून, हा राजकीय बंद नाही. त्यामुळे सर्वांनी या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. शाळेत मुली सुरक्षित नसतील तर ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ या वाक्याला काहीही अर्थ राहणार नाही.
माझ्या माताभगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत, ही भूमिका सर्वच राजकीय पक्षांची असली पाहिजे. कोरोना काळात एखाद्या कुटुंबाप्रमाणे या विषाणूविरोधात लढलो होतो. तशीच वेळ आता पुन्हा आली असून या विकृतीचा बंदोबस्त करण्यासाठी महाराष्ट्रातील बांधवांनी, माताभगिनींनी उत्स्फूर्तपणे बंद पाळावा, असेही ठाकरे म्हणाले.
हातात बांधलेल्या राखीच्या बंधनाला जागाबदलापूरमध्ये ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते? राज्यभर या घटनेचा निषेध होत असताना मुख्यमंत्री रत्नागिरीमध्ये हात पसरून बसले होते. मुख्यमंत्र्यांनी हातात बांधलेल्या राखीच्या बंधनाला जागावे. बदलापूरचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते, असा आरोप होतोय. परंतु एखाद्या घटनेचा निषेध करणे राजकारण कधीपासून वाटायला लागले? निषेधही करायचा नाही का, असा सवालही ठाकरे यांनी केला.