मुंबई : वरळीमधल्या कॅम्पा कोला कम्पाउंडमधील इमारतीच्या बेकायदा मजल्यांभोवतालचा फार्स महापालिका प्रशासनाकडून अधिकाधिक आवळला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे आता तर अनधिकृत मजल्यांवरील रहिवाशांकडून येथील कम्पाउंडमध्ये ठोकण्यात आलेल्या तंबूलाही नोटीस धाडण्यात येणार आहे.
कॅम्पा कोलामधील रहिवाशांनी आशेचा एक किरण म्हणून पुन्हा एकदा दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायलयाने मंगळवारी फेटाळून लावली होती. परिणामी, काहीच गत्यंतर नसल्याने इमारतीच्या बेकायदा मजल्यांवरील रहिवाशांनी सदनिका रिकाम्या करण्यास सुरुवात केली आहे. मात्र रहिवाशांनी येथे तंबू ठोकला असून, त्या तंबूमध्ये रहिवाशांचे साहित्य मांडण्यात आले आहे. तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत अद्याप प्राप्त झालेली नाही. ती प्रत प्राप्त झाल्यानंतर शुक्रवार अथवा शनिवारी नोटीस धाडत रहिवाशांना सदनिका रिकाम्या करण्यास मंगळवार्पयतची मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर बुधवारी येथील प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. कॅम्पा कोलामध्ये ठोकण्यात आलेल्या तंबूची माहिती पालिका प्रशासनाला मिळाल्यानंतर प्रशासनाने त्यावरदेखील कार्यवाहीला सुरुवात केली. येथे ठोकण्यात आलेला तंबू अंदाजे किती मोठा आहे? याची माहिती अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी संबंधित अभियंत्यांकडून मागविली आहे.