ठाणे : मुंब्रा आणि कळवा भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाही येथील नागरीक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर आता ठाणे महापालिका प्रशासनाने या संदर्भात टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कळव्यात् पुढील सुचना येईपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या भागातील १२ इमारती तर मुंब्य्रातील एकाच भागात आढळलेल्या ९ रुग्णांच्या येथील ३८ इमारतीमधील तब्बल ७५०० कुटुंबांच्या इमारतींनाच आता लॉक लावण्याची मोहीम पालिकेने शुक्रवारी सांयकाळ पासून सुरु केली आहे. तसेच या भागात आरोग्य विभागाकडून सर्व्हे सुरु असतांना दोन नागरीकांनी अडथळा आणल्याने त्यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली. अशा एकूण कळवा, मुंब्य्रातील तब्बल ५० इमारतींना पालिकेने लॉक लावण्यास सुरवात केली आहे. मुंब्रा आणि कळवा भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कळवा आणि मुंब्रा भाग हा पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. असे असतांनाही येथील रहिवाशी रस्त्यावर फिरतांना दिसत होते. मुंब्य्रात तर तोबा गर्दी दिसून येत होती. त्यात गुरुवारी कळव्यात पुन्हा दोन आणि मुंब्य्रात तब्बल ५ रुग्णांची भर पडली. त्यामुळे आता मुंब्य्रात ९ आणि कळव्यात एकूण १२ रुग्ण हे कोरोना बाधीत आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पालिकेचे उपायुक्त मनीष जोशी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कळवा, मुंब्य्रातील वाढत्या कोरोना बाधीत रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कळव्याच्या बाबतीत ज्या ज्या भागात कोरोनाचा रुग्ण आढळला आहे, त्या भागातील सोसायटीच्या चेअरमनवर महत्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. त्यानुसार त्या चेअरमननेच सोसयटीला टाळे लावावे, नागरीकांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर येण्यास मज्जाव करावा अशा सुचना दिल्या गेल्या आहेत. तर कळव्यातील १२ इमारतींना लॉक लावण्यास सुरवात झाली आहे.दुसरीकडे मुंब्य्रातील अमृत नगर भागात कोरोनाचे ९ रुग्ण आढळले असल्याने पालिका आणि पोलिसांनी आता येथील ३८ इमारतींना टाळे ठोकण्याची सुरवात केली आहे. यामध्ये तब्बल ७५०० कुटुंबाचे वास्तव्य आहे. या रहिवाशांना जे काही अत्यावश्यक सामान लागणार आहे, ते महापालिकेच्या माध्यमातून पुरविण्याची हमी देण्यात आली आहे. येथील नागरीक ऐकत नसल्याने गर्दी करु नका, असे सांगितले जात असतांनाही त्यांच्याकडून ही कृती होत असल्यानेच हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती महाापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली. दुसरीकडे या भागात सर्व्हेसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनाही येथील काही नागरीकांनी अटकाव केल्याने दोघांच्या विरोधात ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तर दुसरीकडे येथील आणि कळव्यातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्या भागातील प्रत्येक सोसायटीच्या चेअरमनवर आता लॉक करण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. मुंब्य्रात वेळ प्रसंगी नागरीक ऐकणार नसतील तर त्या सोसायटींना या चेअरमनने लॉक लावावेत अन्यथा पालिका आणि पोलीस हे या दोघांकडून त्या सोसायटींनाच लॉक लावले जातील असा इशाराही देण्यात आला आहे. तशीच काहीशी भुमिका ही कळव्याच्या बाबतीतही घेण्यात आली आहे. कळव्यातही पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले असून येथील रहिवाशांना लागणारे अत्यावश्यक साहित्य पुरविण्याची तयारी पालिकेने केली आहे. मात्र चेअरमनवर देखील अशाच पध्दतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत असे टोकाचे पाऊल राज्यात कुठेही उचलण्यात आलेले नाही. मात्र आता कळवा आणि मुंब्य्राच्या बाबतीत नागरीक ऐकत नसल्याने पालिकेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
- मुंब्य्रातील ३८ इमारतींना लॉक लावण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच कळव्यातील देखील १२ इमारतींना अशाच प्रकारे लॉक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरीक ऐकत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. येथील किरणा दुकाने, भाजी मार्केटही बंद असणार आहेत. तर मेडीकल सुरु राहणार असून दुध विक्री सुरु ठेवायची की बंद याबाबतचा निर्णय घेतल जाणार आहे.
(जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माण मंत्री )