लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दत्तक घेतलेल्या मुलाला अविवाहित आईचीच जात लावून दोन आठवड्यात जात प्रमाणपत्र द्यावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने धारावी विभाग उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले.
बोरिवलीच्या रहिवासी व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या ४४ वर्षीय महिलेने आपल्या दत्तक मुलाला आपलीच जात लावण्यात यावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. एस. बी. शुक्रे व न्या. जी. ए. सानप यांच्या खंडपीठाने त्यांची याचिका मान्य करत वरील निर्देश दिले. संबंधित महिलेतर्फे ॲड. प्रदीप हवनूर यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली. याचिकेनुसार, संबंधित महिलेची जात हिंदू मह्यावंशी (अनुसूचित जाती) आहे. आपल्या मुलालाही त्याच जातीचे प्रमाणपत्र दता यावे, यासाठी महिलेने २०१६ मध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. मात्र, ३ सप्टेंबर २०१६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज फेटाळला.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्याने संबंधित महिला जिल्हा जात पडताळणी समितीकडे अपिलात गेली. मात्र, समितीनेही त्यांचे अपील फेटाळले. त्यामुळे महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने हवनूर यांचा युक्तिवाद मान्य करत मुलाला दोन आठवड्यात आईची जात लावून जात प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले.