मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून कोल्हापूर आणि नाशिकमध्ये करोडो रुपये भरून बॅगा आणल्या होत्या, असा दावा ठाकरे गटाचे राज्यसभा खासतदार संजय राऊत यांनी केला होता. यावरून आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर आले आहे.
कुठल्याही नेत्यासोबत प्रचारासाठी कपड्यांच्या बॅगा या असतात. उद्धव ठाकरे आले त्यावेळी त्यांच्याकडे देखील बॅगा होत्या. राजकीय नेत्यांसोबत येणाऱ्या इतरांच्या देखील बॅग असतात. संजय राऊत यांच्या डोक्यावर झालेला परिणाम आपल्याला दिसून येत आहे, असा टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
महाविकास आघाडीला आता पराभव दिसत असल्याने चोरून व्हिडिओ काढणे आणि ते व्हायरल करून त्याच्या बातम्या बनवणे हेच काम उरले आहे. बघा पैशांचा अमाप वाटपामुळे आमचा पराभव झाला, ही कारणे ते आता शोधत आहेत. एवढेच होते तर त्यांनी पोलिसांत तक्रार का केली नाही. आम्ही देखील मातोश्रीवर बॅगा पोहोचवल्या होत्या. त्या अशा उघड पोहोचवल्या नव्हत्या, त्याचे व्हिडीओ पहायचे आहेत का, असा सवालही शिरसाट यांनी केला.
कधी ईव्हीएम मशीनवर घोटाळ्याचा आरोप करायचा, तर कधी असले व्हिडिओ व्हायरल करायचे. कोणताही मूर्ख माणूस अशा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का, परंतु याच मुर्खांच्या लक्षात फक्त तेवढेच येणार आहे, असे जोरदार प्रत्युत्तर शिरसाट यांनी दिले आहे.