मुंबई : ‘मी ऊर्जा भारतीय. माझे आईवडील माझे शैक्षणिक शुल्क भरण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत. तेव्हा मला सवलत नको’ अशी भूमिका रुपारेल कॉलेजचे प्राचार्य ते थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यापर्यंत मांडून एका कॉलेज कन्येने गॅस सबसिडीप्रमाणे शैक्षणिक सवलती नाकारता येतील का, असा नवा विषय चर्चेला आणला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय यांची ऊर्जा ही कन्या. ती माटुंगामधील रुईया कॉलेजमध्ये कला शाखेची पदवीच्या पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. राज्यात मुलींना शिक्षण मोफत दिले जाते. मात्र, आपल्याकडून मुलांकडून आकारले जाते ते शिक्षण शुल्क आकारावे असे साकडे तिने रुईया कॉलेजच्या प्राचार्यांना पत्राद्वारे घातले. माझ्याप्रमाणे शुल्क भरण्याची आर्थिक ऐपत असलेल्या इतर विद्यार्थ्यांनीदेखील सवलत नाकारली पाहिजे, असे तिने या पत्रात म्हटले आहे. आरक्षण असलेल्या वर्गांमधील विद्यार्थ्यांना तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळालीच पाहिजे ही माझी भूमिका आहे. मात्र, हे शुल्क भरण्याची कुवत असलेल्यांनी सवलत नाकारावी. त्याचा फायदा इतर वंचितांना या ना त्या कारणाने होऊ शकेल, असे मतही ऊर्जाने पत्रात व्यक्त केले आहे. ऊर्जाने आज मंत्रालयात येऊन शिक्षणमंत्री तावडे यांना हेच पत्र दिले. शैक्षणिक शुल्काची सवलत नाकारण्याची कोणतीही तरतूद सध्या नाही. मात्र, या निमित्ताने असा पर्याय दिला जाऊ शकतो काय याचा विचार राज्य सरकार नक्कीच करेल, असे तावडे यांनी ऊर्जाला सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
शैक्षणिक सवलत नाकारता येईल का?
By admin | Published: October 18, 2016 5:14 AM