ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 31 - विधानसभा आणि विधान परिषद ही संविधानाने तयार केलेली सभागृहे असून, दोन्ही सभागृह सार्वभौम आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आमदारांना सभागृहाचा अवमान करणारे मत मांडता येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत एका निवेदनाद्वारे सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदनात म्हटले की, विधान परिषद तसेच राज्यसभा हे ज्येष्ठांचे सभागृह म्हणून ओळखले जाते. या सभागृहाचा मान-सन्मान राखणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. या दोन्ही सभागृहांतून विविध प्रश्न मांडले जाण्याबरोबर विविध विषयांवर ज्येष्ठ सदस्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शनही देण्यात येते, त्यामुळे दोन्ही सभागृहांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे.ज्येष्ठांच्या सभागृहाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर मते आणि चर्चा होतात, एका समृद्ध लोकशाहीसाठी हे आवश्यक आहे. विधानसभा सदस्य अनिल गोटे यांनी केलेल्या विधानाचे राज्य शासन म्हणून आणि वैयक्तिक मी समर्थन करीत नाही. या निवेदनाच्या माध्यमातून मी सभागृहातील सदस्यांना आश्वासित करतो की, सभागृहातील सदस्यांचा सन्मान राखला जाईल. विधान परिषद सदस्य सर्वश्री सुनील तटकरे, भाई जगताप, नारायण राणे, जयंत पाटील यांनी विधानसभा सदस्य अनिल गोटे यांनी केलेल्या विधानाबद्दल आक्षेप घेत राज्य शासनाने याबाबत निवेदन देण्याची मागणी केली होती.
सभागृहाचा अवमान करणारे मत मांडता येणार नाही- मुख्यमंत्री
By admin | Published: March 31, 2017 8:33 PM