कोल्हापूर : उतणार नाही, मातणार नाही, जनतेच्या सेवेचा वसा सोडणार नाही. जनतेने दिलेल्या आश्वासनांचे सोने केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द राज्यातील जनतेला देणारा ठराव भाजपा राज्य परिषदेत शनिवारी मांडण्यात येणार आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत शनिवारी मांडण्यात यावयाच्या तीन ठरावांच्या मसुद्याला मान्यता देण्यात आली. केंद्र सरकारचे अभिनंदन आणि राज्य सरकारचे अभिनंदन असे दोन ठराव आहेत. तिसऱ्या ठरावाद्वारे विविध राष्ट्रपुरुषांची स्मारके उभारण्यासाठी ठोस प्रयत्न केल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात येणार आहे.फडणवीस सरकारचे अभिनंदन करतानाच्या ठरावात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी फारकत घेऊन स्वबळावर लढण्याच्या पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. १९९०मधील निवडणुकीनंतर विधानसभेच्या कुठल्याच निवडणुकीत राज्यात एका पक्षाला स्वबळावर तर सोडाच युती करूनही १०० पेक्षा अधिक जागा मिळालेल्या नव्हत्या. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढून १००पेक्षा जास्त जागा मिळवून सत्ताही स्थापन करण्यात यश आले, असे ठरावात म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातीला सरकारच्या सहा महिन्यांच्या कारकिर्दीचे प्रचंड कौतुक या ठरावात करण्यात आले आहे. सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचारमुक्त, गतिमान व पारदर्शी प्रशासन सरकारने दिले आहे, असे प्रशस्तीपत्र देताना या सरकारच्या अनेक निर्णयांचा उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. १५ वर्षांतील भ्रष्टाचारी व ढिसाळ कारभारामुळे राज्यावर तीन लाख कोटींपेक्षा अधिकचे कर्ज झाले, अशी टीकाही ठरावात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या अभिनंदन ठरावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली आहे. (विशेष प्रतिनिधी)
उतणार नाही, मातणार नाही...
By admin | Published: May 23, 2015 1:05 AM