स्पर्शाने कोरोना संक्रमित होऊ शकतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 05:49 AM2020-06-05T05:49:10+5:302020-06-05T05:49:26+5:30
उच्च न्यायालय; तज्ज्ञांकडे केली विचारणा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा वाहक असलेल्या व्यक्तीचा केवळ स्पर्श झाला म्हणून दुसऱ्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? या शंकेचे निरसन करण्याचे निर्देश उच्च न्यायलायने नागरी उड्डाण मंत्रालयाने विमान प्रवास करणाºया नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीला दिले.
मिशन ‘वंदे मातरम’अंतर्गत परदेशातून विमानाने नागरिकांना परत आणताना त्यांच्या आरोग्याशी तडजोड करण्यात येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये अंतर ठेवण्यात येत नाही. मधली सीट रिक्त ठेवली जात नाही, अशी तक्रार करणारी याचिका एअर इंडियाचे पायलट देवेन कनानी यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. गुरुवारच्या सुनावणीत डीजीसीएच्या वकिलांनी न्यायालयात तज्ज्ञ समितीने घेतलेल्या बैठकीतील इतिवृत्त सादर केले.
या इतिवृत्तानुसार, दोन व्यक्तींमध्ये शारीरिक अंतर
ठेवल्यास स्पर्शाद्वारे होणार कोरोनाचा संसर्ग थांबवू शकतो. एकमेकांच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांना संरक्षणात्मक सूट देऊन कोरोनाचा संसर्ग टाळू शकतो. कोरोनाचा वाहक असलेल्या व्यक्तीचा केवळ स्पर्श झाला म्हणून दुसºया व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का? अशी शंका उपस्थित करत न्यायालयाने याचे उत्तर समितीला देण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, स्पाईस जेट, गो एअर आणि इंडिगो यांनीही या याचिकेत मध्यस्थी करण्यासाठी न्यायलायत अर्ज केला. न्यायलायने या सर्व अर्जांवरील सुनावणी शुक्रवारी ठेवली.