मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भाजपासोबत युतीचा निर्णय घेण्यापूर्वी नाणार प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पविरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. नाणार प्रकल्पासाठी एमआयडीसीने भूसंपादनाचा अध्यादेश जारी केला आहे. भाजपासोबत युतीची बोलणी सुरू करण्यापूर्वी हा अध्यादेश रद्द करावा. तशी पूर्वअटच शिवसेनेने भाजपासमोर ठेवावी. अध्यादेश रद्द न होताच युतीची बोलणी झाली तर संघटना तत्काळ स्वत:ची वेगळी भूमिका घेत कृती करेल, असा इशारा पदाधिकाºयांनी दिला. शिवाय, शिवसेनेचे काही स्थानिक पदाधिकारी प्रकल्पाच्या बाजूने भूमिका घेत असल्याची बाबही कृती समितीच्या पदाधिकाºयांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. यावर, युतीची बोलणी सुरू होण्यापूर्वी अध्यादेश रद्द करण्याचे आश्वासन उद्धव यांनी दिले असून त्यासाठी दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितल्याचे संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.
‘युती करण्याआधी नाणार रद्द करा’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 6:15 AM