लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पहिल्या दोन टप्प्यांत झालेले मतदान आपल्या विरोधात झाल्याचा अंदाज आल्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. भाजपने रविवारी दिलेली जाहिरात त्यांच्या ध्रुवीकरणाच्या अजेंड्याचे प्रतीक आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन भाजपसह महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भाजपने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीविरोधात तक्रार केली. लोंढे म्हणाले, पहिल्या दोन टप्प्यात झालेले मतदान आपल्या विरोधात झाले आहे याची जाणीव झाल्याने नरेंद्र मोदी आता धार्मिक अजेंडा आणि पाकिस्तानला निवडणूक प्रचारात घेऊन आले आहेत. तुमच्या मताने कुठे जल्लोष व्हायला हवा आहे, भारतात की पाकिस्तानात, अशी जाहिरात भाजपने दिली आहे.
भाजपला भारत आणि पाकिस्तानमधला फरक कळत नाही का? असा सवाल करून पंतप्रधान हतबल, निराश आणि वैफल्यग्रस्त झाल्याची टीका लोंढे यांनी केली.