पुणे : गुणवत्ता यादीत झालेला गोंधळ आणि परीक्षेवर घेण्यात आलेले गंभीर आक्षेप, यामुळे अखेर कृषी सहायक भरती परीक्षा व निवड यादी रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. कृषी आयुक्तालयाच्या वतीने कृषी सहायक पदांच्या ७३० जागांच्या भरतीसाठी डिसेंबर २०१५मध्ये जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार, राज्यातील आठ विभागांत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ६ आॅगस्ट २०१६ रोजी परीक्षा घण्यात आली. परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबर २०१६ रोजी लावण्यात आला. मात्र, त्यावरून प्रचंड वादंग निर्माण झाले. गुणवत्ता यादीत एकाच उमेदवाराची दोन विभागांतून निवड, कट आॅफ गुण व प्रतीक्षायादीतील उमेदवारांच्या गुणांमध्ये तफावत असणे, वयाच्या निकषांत न बसणाऱ्या उमेदवारांची केलेली निवड, असे अनेकप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे परीक्षार्थींनी चार महिन्यांपासून उभारलेल्या लढ्याला यश मिळाले, असे आंदोलनकर्ता परीक्षार्थी स्वप्निल देवरे याने सांगितले. (प्रतिनिधी)
वादग्रस्त कृषी परीक्षा रद्द
By admin | Published: January 28, 2017 3:40 AM